कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : ना. मुश्रीफ, पाटील यांच्यासह 19 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : ना. मुश्रीफ, पाटील यांच्यासह 19 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी 19 उमेदवारांनी 36 अर्ज दाखल केले. यामध्ये ग्रामविकासमंत्री आणि बँकेचे विद्यमान अध्यक्ष हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खा. संजय मंडलिक, आ. विनय कोरे यांच्यासह आजी-माजी संचालक आणि लोकप्रतिनिधींचा समावेश आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) बिनविरोध करण्यासाठी एका बाजूला जोरदार प्रयत्न सुरू असताना इच्छुकांची संख्याही वाढणार असल्याचे संकेत आहेत. पहिल्याच दिवशी दिग्गजांनी जोरदार शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केले. पालकमंत्री सतेज पाटील यांनी 66 पैकी 46 मतदारांची ओळख परेडच यानिमित्ताने केली. तर विद्यमान अध्यक्ष ना. मुश्रीफ यांच्यासह खा. संजय मंडलिक आणि भैया माने यांनी माजी आमदार संजय घाटगे यांच्या उपस्थितीत एकत्रित उमेदवारी अर्ज दाखल करत कागल तालुका एकसंध आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न केला.

यड्रावकरांचा विजयाचा दावा ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

काँग्रेसचे गणपतराव पाटील आणि राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यापैकी एकाने माघार घेत एकोपा राखण्याचे वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ना. यड्रावकर यांनी तब्बल पाच अर्ज दाखल करत दीडशेहून अधिक मतदार सोबत असल्याचे सांगत विजयाचा दावा केला.

19 उमेदवारांचे 36 अर्ज दाखल ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक )

गगनबावडा तालुक्यातून पालकमंत्री सतेज पाटील यांनी दोन अर्ज भरले. विद्यमान अध्यक्ष ना. हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातून दोन अर्ज दाखल केले. एका अर्जावर खा. संजय मंडलिक, तर दुसर्‍या अर्जावर माजी आमदार संजय घाटगे सूचक आहेत. शिरोळ तालुक्यातून राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पाच अर्ज भरले. पन्हाळ्यातून आमदार विनय कोरे यांनी दोन उमेदवारी अर्ज भरले. शाहूवाडीतून जि.प. सदस्य आणि संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भुदरगड तालुक्यातून माजी आमदार के. पी. पाटील आणि संचालक रणजित पाटील यांनी प्रत्येकी तीन अर्ज भरले. गडहिंग्लजमधून संचालक संतोष पाटील, तर हातकणंगलेतून शिरीष देसाई यांनी एक अर्ज भरला. कृषी पणन व शेतीमाल प्रक्रिया गटातून खा. संजय मंडलिक यांच्या एका उमेदवारी अर्जावर ना. मुश्रीफ हे सूचक आहेत. मंडलिक यांच्यासह या गटातून बाबासाहेब पाटील यांनीही दोन अर्ज भरले आहेत. नागरी बँक आणि पतसंस्था गटातून विलास पाटील, अशोक पोवार यांनी उमेदवारी दाखल केली. इतर शेती संस्था आणि व्यक्ती सभासद गटातून प्रताप माने यांनी दोन अर्ज भरले. महिला गटातून संचालिका माजी खासदार निवेदिता माने आणि उदयानी साळुंखे यांच्यासह रेखा कुराडे यांनी उमेदवारी दाखल केली.

Back to top button