corona : कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही - पुढारी

corona : कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात तब्बल 20 महिन्यांनंतर सोमवारी कोरोनाचा ( corona ) एकही नवा रुग्ण आढळून आला नाही. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात 26 मार्च 2020 रोजी कोरोनाचा ( corona ) पहिला रुग्ण सापडला. यानंतर झपाट्याने संसर्ग वाढू लागल्याने त्याच्या धास्तीने नागरिक भयभीत झाले होते. 20 महिन्यांत जिल्ह्यात एकूण 2 लाख 6 हजार 761 कोरोनाबाधित सापडले. त्यापैकी 2 लाख 9 हजार 35 जणांनी या आजारावर मात केली. तर 5 हजार 796 जणांचा मृत्यू झाला.

सद्यस्थितीत 30 बाधितांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सोमवारी दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. गेले 15 दिवस एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही, ही समाधानकारक बाब आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा ( corona ) पहिला रुग्ण सापडल्यानंतर प्रशासन हादरून गेले होते. संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या. तरी कोरोना संसर्गाचा मे ते ऑक्टोबर 2020 अखेर उद्रेक झाला. रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूंमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष कोल्हापूर जिल्ह्याकडे लागून होते. ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाचेे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राज्याच्या आरोग्य विभागाने परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती पाठविली होती. वाढता संसर्ग लक्षात देऊन आरोग्यमंत्री कोल्हापुरात आले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना केल्या. त्यानुसार टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रिटमेंट यावर लक्ष केंद्रित केले गेले. तसेच कडक लॉकडाऊनचा मार्गही जिल्हा प्रशासनाने अवलंबला. त्यामुळे कोरोना संसर्गाचा जोर कमी होत गेला. नोव्हेंबर 2020 ते मार्च 2021 अखेरपर्यंत परिस्थिती काहीअंशी बरी होती; पण 1 एप्रिल 2021 नंतर पुन्हा संसर्गाने जोर धरला. ऑगस्टपर्यंत या संसर्गाची तीव—ता अधिक राहिली.

जानेवारी 2021 पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात झाली. टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रिटमेंटबरोबरच आरोग्य विभागाने लसीकरणाची मोहीम हाती घेतली. त्यामुळे कोरोना संसर्गाला अटकाव बसला. सप्टेंबर 2021 नंतर कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत गेली. सोमवारी (दि. 29 नोव्हेंबर) 20 महिन्यांनंतर जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे आरोग्य विभागात समाधानाचे वातावरण होते.

Back to top button