Kolhapur District Bank : आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची धांदल | पुढारी

Kolhapur District Bank : आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची धांदल

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (Kolhapur District Bank) बँकेसाठी सोमवार (दि. 29) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंत मुदत आहे.

दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह बहुतांश संचालक सोमवारी पहिल्याच दिवशी अर्ज दाखल करणार आहेत.

मागील आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात दोन स्वतंत्र याचिकांवर खंडपीठाने निकाल देत जिल्हा बँकांच्या निवडणुका तत्काळ घेण्याचे आदेश दिले होते.

यानंतर शुक्रवारी (दि. 26) सहकार निवडणूक प्राधिकरणाने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा (Kolhapur District Bank) निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दुपारी तीनपर्यंत अर्ज दाखल करणे, 6 डिसेंबरला अर्जांनी छाननी, तर 7 डिसेंबरला उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. अर्ज माघारीसाठी 7 ते 21 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. यानंतर 22 डिसेंबरला चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 21 संचालकांच्या जागांसाठी 5 जानेवारी 2022 ला मतदान घेण्यात येणार आहे, तर 7 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी विभागीय सहनिबंधक आणि निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे काम पाहत आहेत.

Back to top button