तिलारी काॅन्झर्वेशन रिझर्वमध्ये केली पट्टेरी वाघाने शिकार | पुढारी

तिलारी काॅन्झर्वेशन रिझर्वमध्ये केली पट्टेरी वाघाने शिकार

कोल्हापूर ; पुढारी ऑनलाईन : तिलारी काॅन्झर्वेशन रिझर्व्ह’मध्ये पट्टेरी वाघाने शिकार केल्याचे आढळून आले आहे. या पट्टेरी वाघाने एका मोठ्या प्राण्याची हत्या केल्याचे कॅमेरामध्ये दिसले आहे. याबाबतची माहिती वन्य जीव विभागाकडून देण्यात आली आहे. डॉ. व्ही. क्लेमेंट बेन भा.व.से. मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांनी याबाबत माहिती दिली.

ते पुढे म्हणाले, तिलारी संवर्धन राखीव, चंदगड संवर्धन राखीव, दोडामार्ग आंबोली संवर्धन राखीव, छत्रपती शाहू महाराज आजरा-बुदरगड संवर्धन राखीव, गगनबावडा संवर्धन राखीव, पन्हाळगड संवर्धन राखीव, विशाळगड संवर्धन राखीव, हे एकीकडे राधानगरी वन्यजीव अभयारण्याला लागून आहेत. तर एकीकडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या चांदोली राष्ट्रीय उद्यान व कोयना अभयारण्य व पुढे जोर जांभळी संवर्धन राखीव पर्यंत सलग लागून आहेत.

 भ्रमणमार्ग अखंड ठेवल्याने प्रजनन क्षेत्रातील वाघ व इतर तरून भक्षी प्राणी हे त्या क्षेत्राला जोडणाऱ्या इतर जंगलात आणि संरक्षित वन क्षेत्रात स्वत:चा स्वतंत्र अधिवास निर्माण करु शकतात हे अधोरेखित होते.

याचबरोबर मानद वन्यजीव रक्षक सातारा तथा सदस्य वन्यजीव अपराध नियंत्रण बुरो म्हणाले, कोयना वन्यजीव अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि राधानगरी वन्यजीव अभयारण्य या आधीच युनेस्कोने जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे म्हणून घोषित केले आहेत. आणि बर्डलाइफ इंटरनॅशनलने महत्त्वाचे पक्षी क्षेत्र म्हणून घोषित केले आहे, हे जगातील जैवविविधतेने समृद्ध असे महत्वाचे स्थान ठरले आहे.

लवकरच लुप्त होण्याच्या धोका असलेल्या व केवळ याच भागात आढळणाऱ्या वनस्पती, प्राणी, पक्षी, व इतर प्रजाती यांनी हा प्रदेश समृद्ध आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दलाची ( स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स ) मंजूरी खूप दिवसांपासून प्रलंबित आहे. महत्वाचे म्हणजे राज्यात व भारतात इतर सर्व व्याघ्र प्रकल्पात स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स मंजूर व तैनात आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दलाची तैनाती लवकरात लवकर शासनाने करावी आणि संपूर्ण प्रदेश विशेष वाघ संरक्षण दलाच्या संरक्षण आणि रक्षणाखाली आणल्यास वन्यजीव गुन्हेगारी आणि बेकायदेशीर बॉक्साईट खाणकाम नियंत्रित करण्यात मोठी मदत होईल तर स्थानिकांना व्याघ्र संरक्षण दलात नोकऱ्या मिळतील.

Back to top button