हनी ट्रॅप दररोजच सुरू आहे; स्टेशन रोड ठरतोय केंद्रबिंदू | पुढारी

हनी ट्रॅप दररोजच सुरू आहे; स्टेशन रोड ठरतोय केंद्रबिंदू

कोल्हापूर : अनिल देशमुख

व्यापार्‍यांना हनी ट्रॅप मध्ये अडकवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले जात असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. याप्रकरणी गुन्हे दाखल होऊन संशयितांना अटकही करण्यात आली आहे. मात्र, या हनी ट्रॅप इतकी मोठी रक्कम नसली, तरी शहरात सध्या दररोज हनी ट्रॅप द्वारे हजारांत लूट होत आहे. त्याचा केंद्रबिंदू स्टेशन रोड ठरत आहे. पोलिसांनी याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

स्टेशन रोडवर शरीरविक्रय करणार्‍या महिलांची संख्या अधिक आहे. या महिलांकडे गेलेल्या अथवा त्यांच्याशी बोलणार्‍यांवर पाळत ठेवायची आणि नंतर त्याला गाठून त्याची लूट करायची, असे प्रकार राजरोस सुरू आहेत. मात्र, लुटीची रक्कम कमी आणि बदनामीची भीती यामुळे याबाबत कोणीच पुढे येत नसल्याने याप्रकरणी कारवाई होत नाही, परिणामी, अशा प्रकारे लुटीचे प्रकार वाढतच चालले आहे. विशेष म्हणजे, या प्रकारात या शरीरविक्रय करणार्‍या महिलांचा काडीमात्रही संबंध नाही. मात्र, त्यांची भीती दाखवून ही लूट केली जात आहे.

असे हेरले जाते सावज

शरीरविक्रय करणार्‍या महिलांकडे जाणार्‍यांवर, त्यांच्याशी बोलणार्‍यांवर लक्ष ठेवायचे. त्या व्यक्तीचा अंदाज घ्यायचा. संबंधित व्यक्ती तेथून बाहेर पडली की, त्याचा पाठलाग करायचा. निर्जन स्थळी, कमी गर्दीच्या ठिकाणावर त्याला अडवले जाते.

पोलिस असल्याची बतावणी

संबंधित व्यक्तीला अडवले की, आपण पोलिस आहोत, असे सांगून त्याच्याकडून ओळखपत्र (शक्यतो आधार कार्ड) मागवून घ्यायचे. त्यानंतर त्याचा मोबाईल क्रमांक घ्यायचा. कागदावर नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, काय काम करतो, कुठे काम करतो हे सर्व लिहून घ्यायचे.

बदनामीची भीती दाखवायची

संबंधित व्यक्तीने खरी माहिती दिल्याची खात्री पटली आणि ती व्यक्ती महत्त्वाच्या ठिकाणी काम करत नसेल, त्यापासून उलटा आपल्याला काही त्रास होणार नसेल, याचा अंदाज आला की, त्याला बदनामीची भीती दाखवयाची. काही वेळापूर्वी ज्या महिलेसोबत तुम्ही होता, तिची तक्रार आहे. तुमच्यावर कारवाई होईल, असे सांगून कारवाई होऊ नये यासाठी रक्कम सांगायची. खात्रीसाठी आपल्याच जवळील महिलेला फोन लावून द्यायचा. यानंतर संबंधित व्यक्तीच्या जवळ असेल तितकी सर्व रक्कम काढून घ्यायची. उर्वरित रक्कम उद्या द्या, अन्यथा घरी, कामाच्या ठिकाणी पोलिस येतील, असे सांगून निघून जायचे, असा सारा हा फंडा आहे.

अल्पवयीन मुले, मध्यमवयीन व्यक्तीच अधिक टार्गेट

या प्रकारात अल्पवयीन मुले, मध्यमवयीन व्यक्तीच मोठ्या प्रमाणात टार्गेट केल्या जात आहेत. प्रथम रक्कम घेताना अंदाज घ्यायचा आणि त्यानंतरच दुसर्‍यावेळी रक्कम मागणीसाठी फोन करायचा. अन्यथा पहिल्या वेळीच मिळालेल्या रकमेवर समाधान मानायचे. एखाद्या व्यक्तीकडून पैसे मिळतच गेले, तर त्याला सातत्याने लूटत राहायचे, असेही प्रकार सुरू आहेत.

भीतीपोटी तक्रारी नाहीत

पोलिस असल्याचे सांगून प्रसंगी घरी, कामाच्या ठिकाणी येण्याची भीती दाखवली जाते. खरोखर पोलिस घरी आले, कामाच्या ठिकाणी आले, अथवा खरोखर संबंधित महिलेने तक्रार केली तर, ही भीती असतेच. त्याबरोबर पोलिसच आहेत, महिलेची तक्रार नको, म्हणून आपणच पैसे दिले आहेत, त्यात पैसे घेणारा पोलिस आहे, तो आपल्याला मदतच करत आहे, या भावनेने तसेच तक्रार दिली तर त्यातून आपलीच बदनामी होईल, आपण तक्रार दिली आणि पुन्हा त्या महिलेने तक्रार दिली तर, अशा अनेक कारणांनी केवळ भीतीपोटी अनेकजण तक्रारीसाठी पुढे येत नसल्याने अशा लुटारूंचे फावत आहे.

Back to top button