..अन् डॉ. डी. वाय. पाटील वारणेत डॉ. विनय कोरेंच्या भेटीला | पुढारी

..अन् डॉ. डी. वाय. पाटील वारणेत डॉ. विनय कोरेंच्या भेटीला

वारणानगर : पुढारी वृत्तसेवा ; कोल्हापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत महाडिक व पाटील या दोन गटांतील टोकाचा संघर्ष आणि ईर्ष्या जिल्ह्यास नवीन नाही. तो टाळण्यासाठी आमदार डॉ. विनय कोरे यांनी यशस्वी मध्यस्थी करून निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी वारणानगर येथे अचानक येऊन डॉ. कोरे यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले.

विधान परिषदेच्या निवडणुकीत पारंपरिक विरोधक मंत्री सतेज पाटील व माजी आमदार अमल महाडिक यांच्यात चुरस निर्माण झाली. राज्यातील अनेक जागा बिनविरोध व्हाव्यात, यासाठी महाविकास आघाडी, भाजप व मित्र पक्षांचे नेते सर्वच पातळीवर प्रयत्न करीत होते. कोल्हापूरच्या जागेकडे विशेष लक्ष लागून राहिले होते.

डॉ. कोरे यांनी कोल्हापूरच्या जागेसंदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून समन्वय घडविला. त्यामुळे कोल्हापूरची जागा बिनविरोध झाली आणि पुन्हा विनय कोरे हे किंगमेकर ठरले. शुक्रवारी सायंकाळी अचानक डॉ. डी. वाय. पाटील वारणेतील दूध संघाच्या कार्यालयात मिटिंगमध्ये विनय कोरे असताना आले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कोरे यांंचा सत्कार करून आभार मानले.

कोल्हापूर विधान परिषदेच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत टोकाचा संघर्ष व ईर्ष्या, घोडेबाजार होऊन सर्वसामान्य जनतेत राजकारण्यांबद्दल वेगळी चर्चा व्हायच्या. या निवडणुकीत मतदार संख्या कमी असल्याने घोडेबाजार होऊ शकला असता. हा थांबविण्यासाठी मी प्रयत्न केला. त्याला यश आले, आ. डॉ. कोरे यांनी सांगितले.

Back to top button