संघर्षाच्या राजकारणावर माघारीचा शिडकावा | पुढारी

संघर्षाच्या राजकारणावर माघारीचा शिडकावा

कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा ; टोकदार राजकीय संघर्ष ते माघार या पाटील-महाडिक घराण्याच्या राजकारणाला विधान परिषदेतील माघारीने काही काळासाठी ब्रेक लागला आहे. ज्याची त्याची सत्तास्थाने कायम ठेवायची का? माघारीमागे हे सूत्र आहे का? हे आता छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीतच स्पष्ट होईल. तूर्त तरी धगधगत्या राजकीय संघर्षावर माघारीने शिडकावा टाकला आहे.

हा संघर्ष टोकदार होणार, हे नेत्यांच्या बैठकीतून स्पष्ट होत होते. सतेज पाटील महाविकास आघाडीचे मंत्री असल्यामुळे त्यांच्या मागे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच भाजपचे काही मोजके असंतुष्ट कार्यकर्ते यांची एकत्रित ताकद होती.

कधी काळी आवाडे यांचा एकेरी उल्लेख करणारे महादेवराव महाडिक त्यांच्याकडे बैठकीसाठी गेले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चांगले संबंध असणारे विनय कोरे महाडिक यांच्या मागे जुने वैर विसरून ठामपणे उभे राहिले. पाटील आणि महाडिक या संघर्षात बाजार भरवायचा नाही, अशी भूमिका जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी घेतली.

या बाजाराचा अनुभव कधी काळी कोरे यांना आला आहे. कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात महाडिकांना शह देण्यासाठी मुश्रीफ-कोरे यांनी काही काळ भूमिका बजावली होती. त्यामुळे कोरे यांनी निर्णायक घाव घालायचा, या उद्देशाने पडद्यामागच्या हालचाली केल्या.
काँग्रेस आघाडी सरकारमध्ये कोरे मंत्री होते. आता ते भाजपबरोबर आहेत.

त्यामुळे या दोन्ही पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध राखून असलेल्या कोरे यांनी ही भूमिका मांडली. सुरुवातीला ती जिल्ह्यापुरती असली तरी ती अमरीश पटेल यांच्यासाठी धुळ्याची जागा भाजपने प्रतिष्ठेची केल्यामुळे एक समान धागा पुढे आला आणि धुळ्यात काँग्रेसचे उमेदवार तळोदाचे नगरसेवक गौरव वाणी यांनी माघार घ्यायची.

त्या बदल्यात कोल्हापूरला काँग्रेसचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या विरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल केलेले भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घ्यायचा असे ठरले. त्यापूर्वी, या मतदारसंघात मतदार हाती असल्याशिवाय निवडणूक रिंगणात उतरणे सोपे नाही.

यशाची खात्री असेल तरच या मतदारसंघाचा विचार करायचा अन्यथा हात दाखवून अवलक्षण करून घेऊ नये, असा मुद्दा भाजपचे माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी बोलून दाखविला. प्राथमिक पातळीवर झालेल्या या चर्चेची राज्य पातळीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली. पक्षाचे मतदार किती? येणारे मतदार किती? आणू शकू असे संख्याबळ किती? अशा अनेक बारीकसारीक गोष्टींवर चर्चा होऊन यश-अपयशाचे गणित मांडण्यात आले.

तेथूनच राजकारणाला नवे वळण देण्याचा विचार पुढे आला. दोन्ही पक्षांतील नेत्यांशी समन्वय साधत विनय कोरे यांनी आणखी एका साथीची भर घातली, तेव्हा या समझोत्याला यश आले.आता या समझोत्यामागे बरीच गणिते दडली आहेत, अशी राजकीय चर्चा आहे. येत्या काळात छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत हे दोन्ही गट भिडणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Back to top button