कोल्हापूर : माघारीमुळे महाडिक यांचा ‘राजाराम’चा मार्ग सुकर | पुढारी

कोल्हापूर : माघारीमुळे महाडिक यांचा ‘राजाराम’चा मार्ग सुकर

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

टोकाच्या राजकीय संघर्षातून प्रचारात कमालीची चुरस निर्माण झाली असताना विधान परिषद निवडणुकीत अमल महाडिक यांनी ऐनवेळी घेतलेल्या माघारीमागचे कारण काय, याची चर्चा आता सुरू झाली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आ. विनय कोरे यांच्यामार्फत मध्यस्थी करावयास लावली. गोकुळ दूध संघात महाडिकांना त्रास दिला जाऊ नये, शिवाय राजाराम सहकारी साखर कारखान्याचा मार्ग सुकर करावा, या अटींवर अमल महाडिक हे माघार घेतील, असे सांगितल्याचे समजते.

जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दशकापासून पालकमंत्री सतेज पाटील व माजी आ. महादेवराव महाडिक यांच्यातील टोकाचा संघर्ष दिवसेंदिवस आणखी तीव— होत असल्याचे चित्र आहे. एकेकाळी महाडिकांच्या सोबत काम करणारे सतेज पाटील व महाडिक यांच्यातकाही वर्षांपूर्वी बिनसले आणि पाटील यांनी महाडिकांच्यापासून फारकत घेतली. पक्षीय राजकारणामुळे पाटील यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांना मदत केली. परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून महाडिकांनी मदत करण्याऐवजी अमल महाडिक यांना भाजपकडून पाटील यांच्या विरोधात रिंगणात उतरविले. तेव्हापासून पाटील आणि महाडिकांच्यात चांगलेच बिनसले. त्यानंतर पाटील संधी मिळेल तेव्हा महाडिक यांच्या विरोधात भूमिका मांडू लागले. गोकुळमधील महाडिकांची सत्ता देखील पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मदतीने हिसकावून घेतली. एवढा टोकाचा संघर्ष असताना देखील विधान परिषद निवडणुकीत महाडिकांनी तडकाफडकी माघार का घेतली, याबाबत राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. माघारीबाबत पडद्याआड झालेल्या चर्चा आता बाहेर येऊ लागल्या असून त्यात फडणवीसांनी विनय कोरे आणि सतेज पाटील यांच्यात चर्चा घडवून आणली आणि विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाली, अशी चर्चा आता सुरू आहे.

एकीकडे राज्यातील विधान परिषदेच्या इतर जागा बिनविरोध होणार, अशी चर्चा गुरुवारी सुरू असताना कोल्हापूरची निवडणूक बिनविरोध होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. त्यामुळे सतेज पाटील यांनी मैदान लढण्याची जय्यत तयारी केली होती. परंतु राज्यस्तरीय सत्ताधारी आणि विरोधक नेत्यांनी परस्पर सामंजस्याने राज्यातील चार जागा बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यात कोल्हापूरचा समावेश करण्यात आला.

Back to top button