कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीचा बिगुल; ५ जानेवारीला मतदान | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीचा बिगुल; ५ जानेवारीला मतदान

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ( कोल्हापूर जिल्हा बँक ) मतदार यादीत नावे समाविष्ट करावी, अशी मागणी केलेल्या 15 संस्थांची याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. न्यायालयाच्या या निर्णयाने निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. 5 जानेवारी रोजी मतदान तर 7 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, सोमवारपासून (दि. 29) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांनी दिली.

मडिलगे (आजरा) येथील शंकरलिंग विकास संस्थेने बँकेची निवडणूक घेण्याबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर 25 नोव्हेंबरला सुनावणी होऊन निवडणूक प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात यावी, असे आदेश न्यायमूर्ती पटेल आणि न्यायमूर्ती जामदार यांच्या खंडपीठाने दिले होते. दरम्यान, दीड महिन्यापूर्वी न्यायमूर्ती काथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठापुढे जिल्ह्यातील 15 संस्थांच्या याचिका होत्या. खंडपीठाने निवडणुकांना तोंडी स्थगिती दिली होती. ती स्थगिती दुसर्‍या दिवशी झालेल्या सुनावणीत उठवली. तसेच सर्व 15 संस्थांच्या याचिका फेटाळून लावत निवडणुका घेण्याचे आदेश दिले.

दरम्यान, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या वतीने कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यास प्राधिकरणाने मंजुरी दिली. आता सोमवारपासून जिल्हा बँकेची रणधुमाळी सुरू होत आहे. विधान परिषद निवडणुकांचा धुरळा खाली बसेपर्यंत आता जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण तापणार आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम ( कोल्हापूर जिल्हा बँक )

  • अर्ज दाखल करणे :          29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर
  • छाननी :                          6 डिसेंबर
  • उमेदवार यादी प्रसिद्ध :     7 डिसेंबर
  • अर्ज माघारीची मुदत :       7 ते 21 डिसेंबर
  • चिन्ह वाटप :                  22 डिसेंबर
  • मतदान :                         5 जानेवारी 2022
  • मतमोजणी :                    7 जानेवारी

Back to top button