अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

नात्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग 1) एस. आर. पाटील यांनी 20 वर्षे सक्तमजुरी व पाच हजार दंडाची शिक्षा सुनावली. अब्दुलगणी इब—ाहीम पटेल (वय 24, रा. हातकणंगले) असे आरोपीचे नाव आहे. डिसेंबर 2017 व जानेवारी 2018 या महिन्यांमध्ये हा प्रकार घडला होता.

आरोपीने बळजबरीने केलेल्या बलात्कारानंतर पीडिता गर्भवती राहिली. यामुळे तिच्या आईने राजारामपुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. आरोपीविरुद्ध बलात्कारसह लहान बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश पाटील यांच्यासमोर चालविण्यात आला. सरकारी वकील अमृता पाटोळे यांनी तेरा साक्षीदार तपासले.

मुख्य साक्षीदार फितूर होऊनही डी.एन.ए. रिपोर्ट, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष, परीस्थितीजन्य पुरावे व सरकारी वकील पाटोळे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने शिक्षा सुनावली. तपास अधिकारी उपनिरीक्षक डी. एम. जाधव, पैरवी अधिकारी हेड कॉन्स्टेबल अशोक शिंगे, शाम बुचडे यांचेही सरकारी पक्षाला सहकार्य मिळाले.

Exit mobile version