कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : आरोप, प्रत्यारोपाने रंगत; भेटीगाठींना जोर - पुढारी

कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : आरोप, प्रत्यारोपाने रंगत; भेटीगाठींना जोर

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

विधान परिषदेच्या निवडणूक मध्ये आरोप, प्रत्यारोपांना आता धार येऊ लागली आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलाच रंग भरू लागला आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर घडामोडींना आणखी वेग येणार आहे.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत ( विधान परिषदेच्या निवडणूक ) मतदारांची संख्या मर्यादित असते. महनगरपालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका आणि नगरपंचायतींचे सदस्य व पंचायत समितीचे सभापती हे या निवडणुकीत मतदार असतात. त्यामुळे या निवडणुकीत प्रचाराच्या सभा, आरोप प्रत्यारोप यापेक्षा वैयक्तिक गाठीभेटी आणि अर्थपूर्ण चर्चा यावरच उमेदवारांचा अधिक भर असतो. चर्चेच्या फेर्‍या पूर्ण झाल्यानंतर मतदारांना सहलीवर पाठविण्याचे नियोजन केले जाते.

विधान परिषदेच्या ( विधान परिषदेच्या निवडणूक ) यावेळच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सतेज पाटील व महाडिक यांच्यात थेट लढत होत आहे. गेल्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक उमेदवार होते. यावेळी त्यांचे पुत्र माजी आमदार अमल महाडिक निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीची पालकमंत्री पाटील यांनी गेल्या एक ते दीड वर्षापासून तयारी सुरू केली आहे. ही निवडणूक भारतीय जनता पक्षाने लढविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी महाडिक कुटुंबातील उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्याचेही ठरविण्यात आले. परंतु, उमेदवार लवकर निश्चित होत नव्हता. दरम्यानच्या काळात मंत्री पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा पूर्ण करत मतदारांच्या गाठीभेटीचा पहिला टप्पा पूर्ण केला होता.

भाजपकडून अमल महाडिक यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री पाटील यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अपुरी व खोटी माहिती भरल्याचा आरोप केला. एवढेच नव्हे तर त्याला न्यायालयात आव्हान देण्याचा इशाराही दिला. यावर पालकमंत्री पाटील यांनीदेखील पलटवार करत महाडिक यांना आपला पराभव दिसत असल्यामुळे रडीचा डाव खेळत असल्याचे सांगितले. उमेदवारी अर्जांच्या छाननीपर्यंत सुरू झालेल्या या आरोप प्रत्यारोपांना उमेदवारी माघारीनंतर अधिक धार येण्याची शक्यता असल्याने या निवडणुकीतील रंगत वाढत आहे.

Back to top button