कोल्हापूर : आणखी दोन बडे व्यापारी ‘हनी ट्रॅप’मध्ये | पुढारी

कोल्हापूर : आणखी दोन बडे व्यापारी ‘हनी ट्रॅप’मध्ये

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापुरातील आणखी दोन बड्या व्यापार्‍यांना हनी ट्रॅप मध्ये ओढून सराईत गुन्हेगारी टोळ्यांनी 36 लाखांना लुटल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. दोन्हीही व्यापार्‍यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडे धाव घेऊन फिर्यादी दाखल केल्या. पथकाने पहाटेस ठिकठिकाणी छापे टाकून म्होरक्यासह 7 जणांना बेड्या ठोकल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. संशयितांत एका युवतीसह महिलेचाही समावेश आहे. याप्रकरणी आणखी सहा ते सात गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

विजय कलकुटगी (रा. दौलतनगर), रोहित साळोखे (रा. शिवाजी पेठ), विजय मोरे, गणेश शेवाळे (रा. जवाहरनगर), फारूख खान (रा. बिंदू चौक) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. महापालिका परिसरातील अल्पवयीन युवतीसह कंदलगाव (ता. करवीर) येथील महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

याप्रकरणी शाहूपुरी आणि शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात विजय कलकुटगी याच्यासह पाचजणांविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. दोन्ही गुन्ह्यांतील 7 जणांना अटक करण्यात आली आहे. अन्य फरारी संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

मंगळवार पेठ परिसरातील व्यापार्‍याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, एका अनोळखी युवतीशी सोशल मीडियावर ओळख झाली. चॅटिंगद्वारे गप्पा रंगत होत्या. युवतीने व्यवसायाच्या अनुषंगाने चर्चा करायची आहे, असे सांगून भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर संबंधित व्यापारी व तरुणी कारने सादळे-मादळे (ता. करवीर) परिसरात गेले. तेथे संशयित तरुणीने वॉशरूमला जाण्याच्या बहाण्याने हॉटेलमधील रूम घेण्यास भाग पाडले.

…अन् विवस्त्र स्थितीत महिलेची एंट्री!

युवती हॉटेलमधील वॉशरूममध्ये जाताच टोळीतील काही साथीदारांनी खोलीचा दरवाजा ठोठावला. 5 ते 7 जण जबरदस्तीने खोलीत घुसले. नेमके त्याचक्षणी वॉशरूममधून विवस्त्र अवस्थेत युवती बाहेर आली. साथीदारांनी आपल्या बहिणीची, तर एकाने पत्नीची अब—ू लुटलीस का? अशी विचारणा करून व्यापार्‍याला बेदम मारहाण केली.

बदनामीची धमकी

संशयितांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत व्यापार्‍याकडून 5 हजार रुपये काढून घेतले. व्यापार्‍याला मोटारीत घालून कुशिरे घाटात नेण्यात आले. तेथे रोडवर उतरवून पुन्हा मारहाण करण्यात आली. तसेच त्याला तुझ्यासह कुटुंबीयांची बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. व्यापार्‍याकडे 50 लाखांची मागणी करण्यात आली. तडजोडीत 10 लाख रुपये देण्याचे ठरले. दि. 2 नोव्हेंबरला 1 लाख रुपये घेतले. उर्वरित रकमेसाठी टोळीने व्यापार्‍याच्या मागे तगादा लावला होता.

संशयित मोबाईलवरून वारंवार संपर्क साधून व्यापार्‍याला धमक्या देत होते. अखेर टोळीच्या त्रासाला कंटाळून व्यापार्‍याने पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक प्रमोद जाधव यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली.

35 लाख रुपये उकळले

दुसर्‍या गुन्ह्यात विजय कलकुटगीसह साथीदारांनी सम—ाटनगर येथील व्यापार्‍याला जाळ्यात अडकवून 35 लाखांची खंडणी वसूल केली आहे. एप्रिल 2019 ते आजअखेर रक्कम उकळण्यात आली. एप्रिल 2019 मध्ये व्यापार्‍याला ‘हनी ट्रॅप’मध्ये गोवण्यात आले. गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन मारहाण करण्यात आली. पोलिस अधीक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन व्यापार्‍याने शिरोलीत कंदलगाव येथील महिलेसह साथीदारांवर गुन्हा दाखल केला.

पोलिस अधीक्षकांकडून प्रमोद जाधवसह टीमचे कौतुक

हनी ट्रॅप मधील संशयितांना जेरबंद करण्यासाठी पथकाने पहाटेला छापे टाकून महिलेसह 7 जणांच्या मुसक्या आवळल्या. निरीक्षक प्रमोद जाधव, विजय कारंडे, प्रदीप पोवार, किरण गावडे, कुमार पोतदार, पांडुरंग पाटील, सुप्रिया कात्रट यांनी ही कामगिरी बजावली. पोलिस अधीक्षकांनी टीमचे कौतुक केले.

आणखी नावे समोर येताहेत

‘हॅनी ट्रप’मध्ये अडकवून लाखो रुपयांना लुटणार्‍या आणखी काही टोळ्यांची नावे चौकशीतून पुढे येत आहेत. फिर्यादी दाखल होताच संशयितांवर कारवाई केली जाईल, असे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले.

Back to top button