शाहूवाडी जवळ सशस्त्र दरोडा; १० लाखांची लूट, कोयत्याने हल्ला | पुढारी

शाहूवाडी जवळ सशस्त्र दरोडा; १० लाखांची लूट, कोयत्याने हल्ला

मलकापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आंबा-तळवडे (ता. शाहूवाडी) येथे सात-आठ सशस्त्र दरोडेखोरांनी शांतय्या शंकरय्या स्वामी यांच्या घरावर दरोडा टाकला. त्यांच्यासह त्यांच्या मुलावर कोयता व पारळीने हल्ला केला. या हल्ल्यात दोघे जखमी झाले. त्यानंतर दरोडेखोरांनी कुटुंबीयांना घरात डांबून रोख रक्कम, सोन्याचे दागिने व कारसह सुमारे 10 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज लांबविला.

मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांनी पुजारी घरात आहेत का? अशी विचारणा करून घरात प्रवेश केला. शस्त्रांचा धाक दाखवून कुटुंबीयांना डांबून ठेवले. शांतय्या व त्यांचा मुलगा सिद्धरामय्या यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर रोख दोन लाख रुपये, सात तोळे सोने आणि चारचाकी वाहन असा 10 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

शांतय्या यांच्या पत्नी जगदेवी, सून श्रीदेवी, नातू आपेश्वर, धनेश्वर व मालेश्वर या सर्वांना एका खोलीत, तर शांतय्या व मुलगा सिद्धरामय्या या दोघांची तोंडे बांधून

बाहेरच्या खोलीत डांबून ठेवले होते. लूट केल्यानंतर दरोडेखोरांनी दरवाजास बाहेरून कडी लावून पलायन केले. स्वामी कुटुंबीयांनी सकाळी आरडाओरडा करून लोकांना बोलावले. सिद्धरामय्या स्वामी यांना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शाहूवाडी पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व श्वान पथकास पाचारण केले होते.घराच्या पन्नास फूट जागेतच श्वान घुटमळले. या घटनेची शाहूवाडी पोलिसांत नोंद झाली आहे.

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, पोलिस उपअधीक्षक रवींद्र साळोंखे, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, गुप्तचर विभागाचे प्रमोद जाधव, पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Back to top button