कोल्हापूर विधान परिषद : सूचकांच्या बोगस सह्या; अपक्ष उमेदवारावर फौजदारी करा | पुढारी

कोल्हापूर विधान परिषद : सूचकांच्या बोगस सह्या; अपक्ष उमेदवारावर फौजदारी करा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषद निवडणुकीच्या कोल्हापूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेल्या संजय मगाडे यांनी सूचक म्हणून नगरसेवकांच्या बोगस स्वाक्षर्‍या केल्याचे निदर्शनास आले आहे. या स्वाक्षर्‍या आमच्या नाहीच, त्या बोगस आहेत, यामुळे या उमेदवारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, संबंधित उमेदवाराचा अर्ज अवैध ठरवावा, अशी मागणी उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून नाव असलेल्या नगरसेवकांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्याकडे मंगळवारी केली. याबाबतची तक्रारही कोल्हापूर शहर पोलिस उपअधीक्षकांकडेही देण्यात आली आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जात या निवडणुकीसाठी मतदार यादीत समावेश असलेल्या मतदारांपैकी सूचक म्हणून 10 मतदारांच्या स्वाक्षरीची आवश्यकता असते. संजय मगाडे यांनी दि.22 रोजी अपक्ष अर्ज भरला आहे. या अर्जात सूचक म्हणून पन्हाळा नगरपरिषदेच्या नगरसेविका पल्लवी नायकवडी, नगरसेवक दिनकर भोपळे, मलकापूर नगरपालिकेचे नगरसेवक मानसिंग कांबळे, जिल्हा परिषद सदस्य महेश चौगुले, शिरोळ नगरपालिकेच्या नगरसेविका करुणा कांबळे, कुमुदिनी कांबळे, सुरेखा पुजारी, इचलकरंजीचे नगरसेवक संजय कांबळे, सायली लायकर आणि कुरुंदवाडच्या नगरसेविका स्नेहल कांबळे या दहा मतदारांची नावे दिली आहेत. त्यांच्या नावापुढे स्वाक्षरीही करण्यात आल्या आहेत. मगाडे यांनी दाखल केलेल्या अर्जात सूचक म्हणून आपल्या नावाची स्वाक्षरी असल्याचे समजताच सर्वच नगरसेवकांनी आश्चर्य व्यक्त करत थेट निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे धाव घेतली.

इचलकरंजी नगरपालिकेचे नगरसेवक संजय कांबळे, शिरोळच्या नगरसेविका करुणा जनार्दन कांबळे, कुमुदिनी सुशांत कांबळे, सुरेखा अण्णाप्पा पुजारी व स्नेहल कांबळे यांनी मगाडे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून केलेल्या स्वाक्षरीला लेखी हरकत घेतली. आपण कधीही या अर्जावर स्वाक्षरी केलेल्या नाही, असे या नगरसेवकांनी स्पष्ट केले.

या हरकतीसोबत पाच नगरसेवकांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसमोर ओळखपत्र आणि स्वाक्षर्‍यांचे नमुने सादर केले. अपक्ष उमेदवार मगाडे यांनी केलेली कृती फसवणूक करणारी आहे. यामुळे आपल्या कार्यालयाच्या वतीनेही फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी नगरसेवक तातोबा पाटील, जनार्दन कांबळे, सूरज कांबळे, अण्णाप्पा पुजारी आदी उपस्थित होते.

Back to top button