एसटी संप : विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पायपीट..! | पुढारी

एसटी संप : विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पायपीट..!

कोल्हापूर : प्रवीण मस्के

कोरोनामुळे दीड वर्षानंतर शाळा व महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यात एसटी कर्मचार्‍यांच्या बेमुदत संपामुळे ग्रामीण, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांवर शिक्षणासाठी रोज 5 ते 10 कि.मी.ची पायपीट करण्याची वेळ आली आहे. एसटी संप मुळे सुमारे 30 हजार विद्यार्थ्यांना फटका बसला असून शैक्षणिक नुकसान होत आहे.

दिवाळी सुट्टीनंतर शहरातील आठवी ते बारावी आणि ग्रामीण पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. शहर व ग्रामीण मिळून सुमारे 5 लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिवाजी विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील वर्ग सुरू झाले आहेत. गेल्या 25 दिवसांपासून 4 हजार एसटी कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला ( एसटी संप ) आहे. संपामुळे जिल्ह्यातील 1600 फेर्‍या रद्द झाल्याने विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. एसटी महामंडळाकडून बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत एसटी प्रवास तर विद्यार्थ्यांना कमी खर्चात पास योजना सुरू आहे. याचा लाभ जिल्ह्यातील सुमारे 25 ते 30 हजार विद्यार्थी घेतात. बेमुदत संप असल्याने सध्या पास वितरण कार्यालय बंद आहे. एसटीच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले आहे.

एसटी नाही, मग चालतच शाळेला जातेय  ( एसटी संप )

पाटपन्हाळा येथील सोनाली पाटीलने शाळेसाठी रोज 7 किमीची पायपीट करावी लागत असल्याची व्यथा मांडली. एसटी संपापूर्वी पाटपन्हाळ्यातून आर.के. सुतार हायस्कूल (फराळे) येथे शाळेला बसने जात होते. आता एसटीचा संप सुरू आहे. ऑनलाईन शिक्षणात अडचणी येत असल्याने शाळेत जाऊन शिक्षण घ्यावे लागते. सकाळी 9 वाजता घराबाहेर पडून मैत्रिणीसमवेत शाळेत चालत जावे लागत आहे. सायंकाळी शाळा सुटल्यावर चालत परत घरी जाताना अंधाराबरोबरच पशू-प्राण्यांची भीती वाटते. अभ्यासावरही परिणाम होत आहे.

18 महिन्यांनंतर कोव्हिड नियमांचे पालन करून शाळा सुरू झाल्या आहेत. सध्या एस. टी. कर्मचार्‍यांचा संप सुरू झाला आहे. त्यामुळे दुर्गम भागातून येणार्‍या विद्यार्थ्यांना वाहनाची कोणतीच सोय नसल्याने दररोज 5 किमी पायपीट करावी लागत आहे. याची दखल घेऊन राज्य सरकार संपावर लवकरात लवकर तोडगा काढून विद्यार्थ्यांची ससेहोलपट थांबवावी.
– सुरेश संकपाळ, चेअरमन, मुख्याध्यापक संघ

इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. रोज 25 किमी प्रवास करून कॉलेजला जात होते. एसटी संपामुळे महाविद्यालयातील प्रॅक्टिकल व इतर शिक्षण घेता येत नाही. ऑनलाईन क्लासही बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून तत्काळ अशा विद्यार्थ्यांची सोय करावी.
– स्नेहा सणगर, विद्यार्थिनी (कोरोची, ता. हातकणंगले)

सध्या विद्यापीठ परीक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू आहे. एसटी संपामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अडचणीचे ठरत आहे. शाळा, महाविद्यालयात पोेहोचताना गैरसोय होत आहे. शैक्षणिक व आर्थिक गणित विस्कटले आहे. शासनाने तत्काळ निर्णय घेऊन एसटी बससेवा सुरू करावी.
– मंदार पाटील, शहराध्यक्ष, मनसे विद्यार्थी संघटना

Back to top button