कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक लांबणीवर? | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक लांबणीवर?

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : मुदत संपलेल्या सेवा सोसायट्यांची निवडणुकीनंतरच नव्या संचालक मंडळाचे ठराव घेऊन बाजार समितीच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेसाठी 1800 हून अधिक सेवा सोसायटींचा नव्याने ठराव घेतला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. परिणामी जिल्हा बँकेची निवडणूक (जिल्हा बँक निवडणूक ) सरासरी चार महिने लांबणीवर पडू शकते, अशी चर्चा सहकार विभागात सुरू आहे.

कोरोनामुळे जिल्हा बँकांचा निवडणुका पुढे गेल्याने पात्र संस्थांना मतदानाचा अधिकार द्यावा, अशी मागणी करत कट ऑफ डेट वाढवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात कोल्हापूर, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे 160 संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली असून अंतिम निर्णय बाकी आहे.

कोल्हापूर जिल्हा बँकेची (जिल्हा बँक निवडणूक ) 7650 अंतिम मतदार यादी 27 सप्टेंबरला प्रसिद्ध झाली आहे. गट क्रमांक 1 सेवा सोसायटी – 1,865, गट क्रमांक 2 कृषी प्रक्रिया – 4,48, गट क्रमांक 3 नागरी बँका आणि पतसंस्था – 1,221, गट क्रमांक 4 पाणी पुरवठ्यासह इतर संस्था – 4,116 अशी मतदार संख्या आहे. बाजार समितीसाठी सेवा सोसायटीचे नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळाचा ठराव दिला जाईल. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीसाठी जुन्या संचालक मंडळाचा ठराव कसा चालेल, हाच नियम जिल्हा बँकेला लागू होणार काय, याकडे सहकार विभागाचे लक्ष लागले आहे.

ताकद वाढवण्याचा प्रयत्न (जिल्हा बँक निवडणूक )

मागील पाच वर्षांच्या कालावधीत अनेक सहकारी संस्थांमध्ये भाजपचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. सहकारात भाजपची ताकद वाढली असल्याचे आतापर्यंतच्या जिल्हा बँकांच्या निवडणुकातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बाजार समितीप्रमाणेच जिल्हा बँकांच्या निवडणुकीत नव्या संचालक मंडळाचे ठराव करून घ्यावेत, असा मतप्रवाह महाविकास आघाडीत आहे. सोसायट्यातील निवडणुकांमध्ये राज्यातील सरकारचा फायदा होऊन महाविकास आघाडीची ताकद वाढेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

Back to top button