कोल्हापूर : ए.वाय.ना हटविले; बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष

कोल्हापूर : ए.वाय.ना हटविले; बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष

Published on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्र्रेसच्या (अजित पवार गट) जिल्हाध्यक्षपदावरून ए. वाय. पाटील यांना अखेर हटविण्यात आले असून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांची बुधवारी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह ए. वाय. पाटील, के. पी. पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, ए.वाय. यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या. बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत ए.वाय. यांनी मुश्रीफ यांच्याविरोधातच आघाडी केली. तेव्हापासून ए.वाय. यांना बदलले जाण्याची चर्चा होती. अखेर बुधवारी बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.

जि.प. सदस्य ते जिल्हाध्यक्ष

विद्यार्थिदशेपासून बाबासाहेब पाटील काँग्रेसमध्ये सक्रिय होते. शाहूवाडी तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणीची व आ. बाबासाहेब पाटील शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली. 1995 मध्ये श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या कारभाराबाबत स्थापन केलेल्या बचाव कृती समितीचे ते अध्यक्ष होते. सन 1997 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. 1999 मध्ये श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत संचालक म्हणून विजयी झाले. 2000 व 2004 मध्ये कारखान्याचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती.
बाबासाहेब पाटील राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सोबत आहेत. 2014 मध्ये त्यांनी शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मुश्रीफ यांच्या पॅनेलमधून बाहेर पडत स्वतंत्रपणे निवडणूक लढवत ते विजयी झाले. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानतंर आसुर्लेकर यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याची पोचपावती म्हणून आसुर्लेकर यांची पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news