कोल्हापूर विमानतळाचा गौरव; सर्वांत जास्त मार्गांवर सेवा देणार्‍या विमानतळांत समावेश | पुढारी

कोल्हापूर विमानतळाचा गौरव; सर्वांत जास्त मार्गांवर सेवा देणार्‍या विमानतळांत समावेश

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योेतिरादित्य शिंदे यांनी कोल्हापूर विमानतळाचा सोमवारी गौरव केला. ‘उडान दिवसा’निमित्त वीर सुरेंद्र साई विमानतळ, झारसागुडा, ओडिशा येथे आयोजित कार्यक्रमात उडाण योजनेंतर्गत सर्वांत जास्त मार्गांवर सेवा देणार्‍या पाच विमानतळांचा सन्मान करण्यात आला. झारसागुडासह पेंगाँग (मेघालय), म्हैसूर (कर्नाटक) आणि जैसलमेर (राजस्थान) यांसह महाराष्ट्रातून कोल्हापूर विमानतळाला हा बहुमान मिळाला आहे.

नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या वतीने सोमवारी ‘उडान दिवस’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विमान कंपन्यांनाही विविध वर्गवारीत गौरविण्यात आले. कोल्हापूर विमानतळावरील सेवा देणार्‍या तीनही कंपन्यांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. विमान प्रवाशांनी कोल्हापूरवर दाखविलेला विश्वास, पालकमंत्री तसेच जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांचे विमानतळ विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न या सर्वांचे हे फलित असल्याचे विमानतळ संचालक कमल कटारिया यांनी सांगितले. कोल्हापूरचे नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विमानतळ कर्मचारी, सेवा देणार्‍या कंपन्या यांचे योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर विमानतळाचे प्रमाणपत्र भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या बिझनेस डेव्हलपमेंट सेलचे कार्यकारी संचालक अनिल गुप्ता यांनी मंत्री शिंदे यांच्याकडून स्वीकारले. यावेळी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंग, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीव कुमार, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सहसचिव उषा पाध्ये, मेघालयचे परिवहन मंत्री लांबरे आदींसह स्थानिक मंत्री, खासदार यावेळी उपस्थित होते.

कोल्हापूर विमानतळाची देशपातळीवर घेतलेली दखल, भविष्यातील विमानसेवा विस्तारण्याची नांदीच ठरेल, असा विश्वास आहे. ‘उडान’ योजनेंतर्गत सर्वाधिक मार्गांवर विमानसेवा सुरू ठेवल्याबद्दल सन्मानित केलेल्या पाच विमानतळांपैकी कोल्हापूर वगळता उर्वरित सर्वच विमानतळ पायाभूत सुविधा आणि आवश्यक साधनसामग्रीत स्वयंपूर्ण आहेत. कोल्हापूर विमानतळाला सुसज्ज अशी अद्याप टर्मिनस इमारतही नाही. तरीही गेल्या तीन वर्षांत कोल्हापूरविमानतळाने मोठी झेप घेतली आहे.

कोरोना काळात सव्वा लाख प्रवासी

कोरोना काळात कोल्हापूरविमानतळाने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यातील तसेच गोव्यासह देशातील अन्य काही विमानतळांपेक्षा जास्त प्रवाशांची ये-जा कोल्हापूरविमानतळावरून झाली होती. या कालावधीत पश्चिम विभागात कोल्हापूर विमानतळ आघाडीवर होते. मे 2020 ते ऑक्टोबर 2021 या कोरोना काळात 3 हजार 398 फ्लाईटस्द्वारे 1 लाख 27 हजार 441 प्रवाशांची ये-जा झाली आहे.

विमानतळाची कामगिरी

कालावधी                                     प्रवासी संख्या        फ्लाईट संख्या

एप्रिल 2018 ते मार्च 2019                     17,845                653
एप्रिल 2019 ते मार्च 2020                  1,32,081              3111
एप्रिल 2020 ते मार्च 2021                     74,476              1974
एप्रिल 2021 ते ऑक्टोबर 2021              52,965              1312
एकूण                                            2,77,367             7050

Back to top button