'दाजीपूर रिसॉर्ट' चे काम रेंगाळले; मंत्र्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता | पुढारी

'दाजीपूर रिसॉर्ट' चे काम रेंगाळले; मंत्र्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता

राशिवडे : प्रविण ढोणे

गव्यासाठी प्रसिध्द असणार्‍या आणि नेत्रसुखद हिरवाईमुळे पर्यटकांना नेहमी खुणावणार्‍या दाजीपूर अभयारण्याजवळील हॉलीडे रिसॉर्टचे काम आता पुन्हा रेंगाळले आहे. या रिसॉर्टचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश खुद्द पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी दिले होते. पण याच आदेशाला वाटाण्याच्या अक्षता दिल्याने रिसॉर्टचे भवितव्य पुन्हा अंधारमय झाले आहे. हा तिढा सोढविण्यात एमटीडीसीची यंत्रणा सपशेल कमी पडली आहे. (दाजीपूर रिसॉर्ट)

राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी या रिसॉर्टबाबत लक्ष वेधून पर्यटन मंत्री ना. ठाकरे यांच्याकडे रिसॉर्टचे काम तत्काळ करण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुसार आमदार ठाकरे यांनी या रिसॉर्टचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश देत, निधी उपलब्धतेसाठी निर्देश दिले होते. परंतू ते निर्देशच यंत्रणेने बेदखल केले आहेत. याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. फक्त ठेकेदाराला सूचना करण्याची तसदी घेतली आहे. तर ठेकेदाराने काम सुरू न करता तांत्रिक बाबींचे घोडे नाचविले आहे.

ठेकेदार आणि यंत्रणेमध्ये तारतम्यच नाही

राधानगरी जलाशयाच्या पश्चिमेला असणार्‍या या रिसॉर्टचे चार वर्षापूर्वी मुख्य दोन मजली चौदा निवासी कक्षाची इमारत, स्वतंत्र उपहार गृह उभारणी पूर्ण झाली आहे. अंतर्गत कामे प्रलंबीत आहेत. परंतू ठेकेदार आणि यंत्रणेमध्ये तारतम्य नसल्याने कामाचा तिढा सुटण्याऐवजी अधिकच घट्ट होत आहे. (दाजीपूर रिसॉर्ट)

अंतिम टप्प्यात आलेली ही योजना रखडत ठेवून पर्यटन विकास महामंडळाने पर्यटन विकासाची पूरती वाट लावली आहे. महामंडळाने २०१९ मध्ये अंतर्गत कामे करण्यासाठी तीन महिन्याचा अवधी दिला होता. प्रादेशिक व्यवस्थापकांनी काम आठवडाभरात सुरू होईल आणि तीन महिन्यात रिसॉर्ट पर्यटकांसाठी खुले करण्याचा प्रयत्न राहील, याची दक्षता घेण्यात येईल असा दावा गेला होता.

ठेका रद्द करण्याचा इशारा कागदावरच

वाढीव मुदतीत ठेकेदाराने काम पूर्ण न केल्यास ठेका रद्द करण्याचा इशारा महामंडळाने दिला होता. पण हा इशारा कागदावरच राहीला असून काम जैसे थे अवस्थेत आहे. यंत्रणेने उर्वरीत कामे निश्चित वेळेत पूर्ण करण्यासाठी कधीच आश्वासक पाऊल उचलले नाही किंवा ठेकेदारावर कारवाईचे धाडस सुध्दा दाखवले नाही.

पर्यटकांसाठी रिसॉर्ट योजनेचा यंत्रणेच्या अनास्था आणि बेफिकीरीमुळे बोजवारा उडाला आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी झटणार्‍या आणि पर्यटन महोत्सवाचे आयोजन करणार्‍या पालकमंत्री सतेज पाटील यांनी यासाठी आक्रमक भूमिका घेतली व जाणीव पूर्वक नेटाचे प्रयत्न केले तरच ही रिसॉर्ट योजना पूर्णत्वाकडे जाणार आहे.

रिसॉर्टच्या उर्वरीत कामासाठी लवकरच पर्यटन विकास महामंडळाच्या सीईओ स्तरावर आढावा बैठक होईल. डिसेंबर २०२१ अखेर कामाला सुरूवात होईल या दृष्टीने प्रयत्न राहतील.

– श्री. बावधने (कार्यकारी अभियंता)

 

वारंवार काही ना काही कारणाने रखडलेल्या या रिसॉर्टचे काम पूर्णत्वाकडे नेणे आवश्यक आहे. दाजीपूर अभयाण्याकडे पर्यटकांचा ओढा वाढत असून पर्यटकांच्या सोयीसाठी बांधण्यात येणारे हे रिसॉर्ट लवकरात लवकर सुरू करून पर्यटकांची गैरसोय दूर करावी.

– अभिजीत तायशेटे (संचालक, गोकुळ)

हे ही वाचा :

Back to top button