कोल्हापूर : ओळख वारसास्थळांची… जुना राजवाड्याचा नगारखाना (Video) | पुढारी

कोल्हापूर : ओळख वारसास्थळांची... जुना राजवाड्याचा नगारखाना (Video)

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

‘जागतिक वारसास्थळ’ म्हणजे ज्याला सांस्कृतिक व भौगोलिकद़ृष्ट्या प्रतिष्ठा व महत्त्व असून त्याला युनेस्कोने मान्यता दिलेले जगातील एखादे ठिकाण होय. जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेल्या वास्तूची देखभाल व संरक्षणासाठी युनेस्कोकडून अनुदान दिले जाते. प्राचीन वारसा सांभाळणे, त्याची काळजी घेणे, तसेच त्यांच्या अभ्यास करून त्याविषयी अधिक माहिती घेणे पुढील पिढीसाठी मोलाचे आहे. याच उद्देशाने युनेस्को या आंतरराष्ट्रीय संघटनेतर्फे दरवर्षी ‘वर्ल्ड हेरिटेज वीक’ म्हणजे ‘जागतिक वारसा सप्ताह’ साजरा केला जातो.

करवीर काशी, छत्रपतींची राजधानी, शाहूनगरी, कला व क्रीडानगरी या व अशा अनेक बिरुदावलींनी कोल्हापूरची जगभर ओळख आहे. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंडाचा सुमारे दोन हजारांहून अधिक वर्षांचा प्रदीर्घ वारसा कोल्हापूरला लाभला आहे. या सर्व कालखंडांची साक्ष देणार्‍या विविध वास्तू, गडकोट, मंदिरे आजही आपले अस्तित्व टिकवून उभ्या आहेत. त्यांची ओळख नव्या पिढीला व्हावी, यासाठी आजपासून ओळख वारसास्थळांची…

जुना राजवाड्याचा नगारखाना…

छत्रपती शहाजी ऊर्फ बुवासाहेब महाराजांनी 1821 ते 1838 या कालावधीत जुना राजवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार असणार्‍या देखण्या नगारखान्याची इमारत निर्माण केली. कसबी पाथरवटांना दरमहा 25 ते 30 रुपये मजुरीवर काम दिले. जोतिबा डोंगरावरील घोटीव दगड कोल्हापुरात आणण्यासाठी 5 हजार कामगार सक्रिय होते. त्यावेळी पूल नसल्याने नदी पात्रातून नावेतून दगड आणण्यात आले. ऑक्टोबर 1834 मध्ये या दिमाखदार इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. आजही ही वास्तू जगभरातील पर्यटक-इतिहासप्रेमींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

पाहा व्हिडिओ :  कोल्हापूर – करवीर संस्थानचे वास्तूवैभव : भवानी मंडप परिसरातील नगारखाना

Back to top button