अवकाळी पाऊस : कारखान्यांसह शेतकर्‍यांना कोट्यवधीचा फटका | पुढारी

अवकाळी पाऊस : कारखान्यांसह शेतकर्‍यांना कोट्यवधीचा फटका

कौलव ; राजेंद्र दा. पाटील : अवकाळी पावसाच्या तडाख्याने जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या ऊस गाळपावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. शेतकर्‍यांसह कारखान्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. ऊसतोडणी, ओढणी यंत्रणा कोलमडली असून, शेतकरीही कोंडीत सापडला आहे.

दीपावलीनंतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला वेग आला आहे. गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कारखान्यांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात मुलुखगिरी सुरू केली आहे.

मात्र, जोमाने हंगाम सुरू होताच अवकाळी पावसाने कारखान्यांच्या अपेक्षावर अक्षरशः पाणी फेरले आहे. सलग चार दिवसांच्या पावसामुळे ऊसतोडणीसह गाळपावर मर्यादा आली आहे. शेतशिवारात ट्रॅक्टर, ट्रकसह टायरगाड्या घालणे मुश्कील झाले आहे. पावसात ऊसतोडणी केल्यास खोडव्याची उगवणी होत नाही. तसेच, जमिनीचे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी तोडण्या घेण्यास उत्सुक नाहीत. परिणामी, रस्त्याकडेला असणार्‍या फडात तोडणी घालून कोटा पुरा करण्याचा प्रयत्न कारखाने करत आहेत.

गाळपासाठी ऊसच उपलब्ध होत नसल्याने कारखान्यांसमोर अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. प्रसंगी दैनंदिन क्षमतेपेक्षा कमी क्षमतेने ऊस गाळप करून कारखाने सुरू ठेवावे लागत आहेत. कमी झाल्यामुळे खर्चाचा भार वाढत आहे. गाळपासाठी लागणारी यंत्रणा कर्मचारी पगार, इंधन व अन्य अनुषंगिक खर्चाचा भार पडत आहे. त्यामुळे पावसाच्या तडाख्याने कारखान्यांना लाखो रुपयांचा फटका बसत आहे. परिणामी, गळीत हंगाम वाढणार असून आर्थिक नुकसानही सोसावे लागत आहे.

पावसामुळे ओढणी मजुरांचे हाल होत आहेत. माळावर राहण्यासाठी झोपड्या मारल्या असून, पावसामुळे ही कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. शेतात ऊस तोडणी ओढणी करणे नाकीनऊ झाले आहे. मराठवाड्यातून ऊसतोडणीसाठी आलेले मजूर दिवसभर ऊसतोडणी करून रोजीरोटी चालवतात. त्यांच्यावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसान होत असून, ऊसमजूर चिंताग्रस्त झाले आहेत. अवकाळीच्या तडाख्याने संपूर्ण साखर साखळीच कोंडीत सापडली आहे.

टोप (पुढारी वृत्तसेवा) : गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्याकडेला असलेल्या उसाला तोडणीसाठी प्राधान्य मिळत आहे. साखर कारखाने महिनाभरापासून सुरू झाले आहेत. ऊस तोडी सुरू झाल्या आहेत. मात्र, गत आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे तोडण्या खोळंबल्या आहेत. पावसाने शेतात पाणी साचून चिखल होऊन रस्त्यापासून लांब असलेल्या शेतातील ऊस तोडणी होत नसल्याने सर्वच टोळ्या रस्त्याकडेला असलेला ऊस तोडण्यावर भर देत आहेत. तोडणीसाठी मजूर व वाहतूकदारांच्या विनवण्या कराव्या लागणार्‍या शेतकर्‍यांना वरुणराजाची कृपा होऊन ‘अच्छे दिन’ आल्याचा अनुभव सध्या येत आहे.

बळीराजाची धास्ती वाढली

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : आठवड्याभरापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. दरम्यान, पडलेल्या मुसळधार पावसामुळे तोडणी, कापणी, मळणी, मशागतीची कामे लांबणीवर पडली आहेत. भाताची मळणी सर्वात प्रभावित झाली असून, शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे बळीराजा धास्तावल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात महापुराच्या तडाख्याने दीड लाख हेक्टरपैकी अर्धा ऊस बाधित झाला आहे. यावर्षी ऊस दराचा तिढा लवकरच सुटला. तसेच, परतीच्या पावसाने दिलासा दिल्याने शेतीची कामे वेळेत पूर्ण होतील, असा अंदाज बळीराजाने बांधला होता. दिवाळीनंतर आठवड्यात साखर कारखान्यांची घडी बसत असतानाच वातावरणात मोठे बदल होऊ लागले.

थंडीची चाहूल लागतेय तोपर्यंत ढग दाटून आले आहेत. आठवड्यात दोन वेळा धुवाधार पाऊस झाला. घात नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. मळणीच्या प्रतीक्षेत असलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिले. सूर्यदर्शन झाले नाही. याचा रब्बीच्या पेरणीवर परिणाम होत आहे. लागण केलेल्या उसाचेही नुकसान होणार आहे. मिश्र वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. वातावरणातील बदल शेतकर्‍यांची चिंता वाढवत आहे.

सरासरी उतार्‍याला फटका

साखर कारखाने सुरू झाल्यानंतर हिवाळा सुरू असतो. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत सरासरी साखर उतारा उंचावण्यासाठी कारखान्यांना तारेवरील कसरत करावी लागते. त्यातच अवकाळीची भर पडली आहे. पावसामुळे सरासरी उतार्‍यात अर्धा ते एक टक्क्यापर्यंत घट होते. परिणामी कारखान्यांना या कालावधीत गाळप होणार्‍या उसाला प्रतिटन पाच ते दहा किलो साखरेचा फटका बसणार आहे. रस्त्याकडेच्या उसाला तोडणीसाठी पसंती दिली जात आहे.

Back to top button