कोल्हापूर : सीपीआरच्या डायलेसिस विभागाला कुलूप ! प्रशासनाचे दुर्लक्ष, रुग्ण उपचाराच्या प्रतीक्षेत | पुढारी

कोल्हापूर : सीपीआरच्या डायलेसिस विभागाला कुलूप ! प्रशासनाचे दुर्लक्ष, रुग्ण उपचाराच्या प्रतीक्षेत

कोल्हापूर : एकनाथ नाईक

किडनी विकाराने त्रस्त झालेल्या रुग्णांना सीपीआरमधील डायलेसिस विभाग ‘देवदूत’ ठरला असतानाच गेल्या पाच दिवसांपासून विभागातील उपकरणे बंद आहेत. त्यामुळे या विभागाला कुलूप आहे. जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून उपचारासाठी येणारे रुग्ण डायलेसिस विभागाचा दरवाजा ठोठावून उपचाराअभावी माघारी परतू लागले आहेत. डायलेसिस विभागातील एकाच वेळी ही उपकरणे बंद पडली कशी, हा संशोधनाचा विषय आहे.

सीपीआर प्रशासनाने या विभागाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. खासगी रुग्णालयांना लाजवेल असा येथील डायलेसिस विभाग आहे. रोटरी क्बल ऑफ हेरिटेज, रोटरी मुव्हमेंट ऑफ कोल्हापूर, बैतुलमाल कमिटीसह अन्य दानशूर व्यक्ती, संघटनांनी विभागाला सुसज्ज करण्याबरोबर अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे शेकडो रुग्णांच्या उपचाराची सोय झाली आहे. अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांमुळे या विभागाचा लौकिक वाढला आहे.

डायलेसिस मशिनद्वारे रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकून शुद्ध रक्त पुरवठा करते. किडनीसारखेच कृत्रिमरीत्या हे मशिन काम करते. डायलेसिसवेळी रक्तातील क्रिएटिन, युरियासारखे विषारी पदार्थ बाहेर काढले जाऊन शरीरातील जास्तीत जास्त पाणी बाहेर काढले जाते.

शरीरातील क्षारांचे प्रमाण डायलेसिस यंत्र नियंत्रणात ठेवते. जेव्हा किडनी पूर्णतः निकामी होते. तेव्हाच डायलेसिसची सुरुवात केली जाते. जिल्ह्यात 850 रुग्ण डायलेसिसवर असून त्यापैकी 600 रुग्ण कायमस्वरूपी डायलेसिसवर अवलंबून आहेत. सीपीआरमध्ये सुमारे 40 ते 50 रुग्ण नियमित डायलेसिसचे उपचार घेतात पण येथील डायलेसिस विभाग बंद पडल्याने रुग्णांची घालमेल वाढली आहे.

गंभीर रुग्णांनी जायचे कुठे ?

सीपीआर रुग्णालय सर्वसामान्य रुग्णांचा आधारवड आहे. मोफत आणि माफक दरात उपचार यामुळे कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी येथे दाखल होतात. सर्पदंश, विष प्राशन केलेल्या रुग्णांना तर या रुग्णालयाने जीवदान दिले आहे. दररोज सुमारे पाच ते सहा रुग्ण ठरलेले असतातच. यामधील बहुसंख्य रुग्णांना डायलेसिस करणे भाग पडते. पण गेले चार दिवस डायलेसिस विभागातील उपकरणे बंद असल्याने काहींना जीव गमवावा लागला आहे.

पर्यायी यंत्रणा का उभा केली नाही?

कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर सीपीआरमध्ये नॉन कोरोना रुग्णांची उपचारासाठी संख्या वाढली आहे. किडनी आजारांनी त्रस्त झालेल्या रुग्णांना डायलेसीस अत्यंत महत्त्वाचे असताना, उपकरणे बंद पडेपर्यंत हा विभाग काय करत होता? पर्यायी यंत्रणा का उभी केली नाही, असा सवाल उपचारासाठी येणार्‍या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमधून उपस्थित होत आहे.

पाहा व्हिडिओ : जेव्हा बाबासाहेब आंबेडकर लढण्याची प्रेरणा बनतात.

Back to top button