कोल्हापूर विधान परिषद : सत्ताधार्‍यांसह विरोधकांना फुटीचा धोका, पाटील – महाडिक यांच्यात ईर्ष्येची लढत; एकेक मत ‘लाख’ मोलाचे | पुढारी

कोल्हापूर विधान परिषद : सत्ताधार्‍यांसह विरोधकांना फुटीचा धोका, पाटील - महाडिक यांच्यात ईर्ष्येची लढत; एकेक मत 'लाख' मोलाचे

कोल्हापूर ः सतीश सरीकर

कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीत ( विधान परिषद निवडणूक ) पारंपरिक कट्टर विरोधक पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे पुत्र व माजी आमदार अमल महाडीक एकमेकांना भिडणार आहेत. दोघांत काटाजोड लढत होत आहे. अवघे 416 मतदार असल्याने एकेक मत लाख मोलाचे ठरणार आहे. परिणामी सर्वाधिक मते मिळविण्यासाठी दोन्हींकडून साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर होणार हे स्पष्ट आहे. दोनच उमेदवारांत अत्यंत ईर्ष्येने निवडणूक होत असल्याने एकेक मत लाख मोलाचे ठरणार आहे. साहजिकच फोडाफोडीला आतापासूनच सुरुवात झाली आहे. मागील निवडणुकीचा इतिहास पाहता काँग्रेस-भाजप या दोन्ही पक्षांना फुटीचा धोका आहे.

विधान परिषदेची ( विधान परिषद निवडणूक ) लढत अत्यंत चुरशीने होत आहे. सतेज पाटील यांच्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेच्या नेतेमंडळीसह करभारी तर अमल महाडिक यांच्यासाठी भाजप-ताराराणी आघाडी नेत्यांसह कारभारी उतरले आहेत. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून रणशिंग फुंकले आहे. महाडिक यांनी अद्याप अर्ज भरला नसला तरी गाठीभेटीवर जोर दिला आहे. दोन्ही गटांकडून टोकणनंतर आता आवश्यक रसदही पुरविण्यात येत आहे. सतेज पाटील व महाडिक कुटुंबीय यांच्यात काही वर्षांपासून अत्यंत टोकाचे राजकारण सुरू आहे. राजकारणातून एकमेकांना संपविण्यासाठी ईर्ष्या केली जात आहे.

एकूण 416 मतदारांपैकी 208 पुरुष आणि 208 महिला मतदार आहेत. एकूण मतदारांपैकी तब्बल 213 मतदार हातकणंगले व शिरोळ तालुक्यात आहेत. सर्वात कमी मतदार अवघे 4 गगनबावड्यात आहेत. 208 महिला मतदारांपैकी हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक 68 मतदार आहेत. त्याखालोखाल 35 महिला मतदार शिरोळमध्ये आहेत. दोन्ही बाजूकडून जास्तीत जास्त मतदारांशी संपर्क साधून मदतीसाठी ग्वाही घेतली जात आहे. बैठका घेऊन रणनीती आखली जात आहे. कोणत्याही स्थितीत मतदार फुटू नयेत यासाठी व्यूहरचना केली जात आहे. कारभार्‍यांद्वारे समर्थक मतदारांवर वॉच ठेवण्यात येत आहे. पारंपरिक विरोधक आमने-सामने असल्याने दगाफटका होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

विरोधकांशी संपर्कच नाही ( विधान परिषद निवडणूक )

मागील निवडणुकीत दोन्ही गटांकडून अर्थकारणाचे राजकारण करून मतदारराजा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधींनी दोघांनाही गंडा घातल्याचे उघड झाले होते. यावेळीही ती स्थिती निर्माण होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. आपल्याकडून टोकण घेतलेल्यांचा विरोधकांशी संपर्क होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सहलीवर पाठविण्याचे नियोजन केले जात आहे.

सतेज पाटील व महादेवराव महाडिक दोघांची मते फुटली! ( विधान परिषद निवडणूक )

2015 मध्ये तत्कालीन विधान परिषद आमदार महादेवराव महाडिक व सतेज पाटील यांच्यात अत्यंत अटीतटीने लढत झाली. 382 मतदार होते. त्यापैकी 250 मते पडतील, असा दावा पाटील यांनी केला होता. तर महाडिक यांनी निकालासाठी न येता गुलाल घेऊनच येणार अशी खात्री दिली होती. मतदानादिवशी पाटील यांच्या समर्थकांच्या वाहनांतून 235 मतदार आले. तर महाडिक यांच्या वाहनांतून 147 मतदार आले. प्रत्यक्षात पाटील यांना 220 तर महाडिक यांना 157 मते मिळाली. सतेज पाटील 63 मतांनी विजयी होत मैदान मारले. 5 मते बाद झाली. सतेज पाटील व महादेवराव महाडिक यांच्या कारभार्‍यांनी समर्थक मतदारांना अज्ञातस्थळी ठेवून आणि नेत्यांच्या वाहनांतून येऊनही मते फुटली. त्याचा धडा घेऊनच दोन्ही गटाकडून या निवडणुकीत पावले टाकली जात आहेत.

मतपत्रिकेद्वारे गुप्त मतदान ( विधान परिषद निवडणूक )

कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी 10 डिसेंबरला मतदान होणार आहे. जिल्ह्यातील 12 तालुक्यांच्या ठिकाणी मतदान केंद्रे असतील. मतदानासाठी मतपत्रिका असून गुप्त पद्धतीने मतदान होईल. मतदानानंतर मतपेट्या कोल्हापुरात आणल्या जातील. मतमोजणी केंद्रात बाराही तालुक्यांतील सर्व मतपेट्यांतील मतपत्रिका एकत्र करण्यात येतील. सर्व मतपत्रिका सर्वांसमक्ष एकमेकांत मिसळल्या जातील. त्यामुळे कोणत्या तालुक्यातील मतपत्रिका किंवा कोणत्या तालुक्याच्या मतपत्रिका हे काहीच समजणार नाही. 416 पैकी 416 मतदारांनी मतदान केले असल्यास त्याची खातरजमा करून मतमोजणी होईल.

विधान परिषदेसाठी मतदार असे…

एकूण मतदार संख्या ४१६

  • जिल्हा परिषद : 66
  • पंचायत समिती सभापती : 12
  • जयसिंगपूर पालिका : 28
  • मुरगूड नगरपालिका : 20
  • कागल नगरपालिका : 23
  • चंदगड नगर पंचायत : 20
  • हातकणंगले नगर पंचायत : 19
  • पेठवडगाव नगरपालिका : 20
  • पन्हाळा नगरपालिका : 19
  • कुरुंदवाड नगरपालिका : 20
  • हुपरी नगरपालिका : 21
  • मलकापूर नगरपालिका : 20
  • गडहिंग्लज नगरपालिका : 22
  • आजरा नगर पंचायत : 20
  • शिरोळ नगरपालिका : 19
  • इचलकरंजी पालिका : 67

Back to top button