इचलकरंजी : महाविकास आघाडीला धक्का; तीन नगरसेविका आवाडेंच्या तंबूत | पुढारी

इचलकरंजी : महाविकास आघाडीला धक्का; तीन नगरसेविका आवाडेंच्या तंबूत

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा

प्रतिष्ठेच्या बनलेल्या विधान परिषद निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील व माजी आमदार अमल महाडिक गटाकडून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. निवडणुकीत एकमेकांचे नगरसेवक गळाला लावत धक्का देण्याची सुरुवात इचलकरंजीतून झाली आहे. शुक्रवारी काँग्रेस व राजर्षी शाहू विकास आघाडीच्या तीन नगरसेविका आ. प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्षाच्या तंबूत दाखल झाल्या. भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उपस्थित राहात त्यांनी आश्चर्याचा धक्का दिला.

इचलकरंजी शहरातील 67 मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांना महाविकास आघाडी तसेच सागर चाळके यांच्या ताराराणी आघाडीने पहिल्या टप्प्यातच पाठिंबा जाहीर केला आहे. आ. प्रकाश आवाडे यांनी अमल महाडिक यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून शुक्रवारी आवाडे यांच्या ताराराणी पक्ष कार्यालयात त्यांच्या समर्थक नगरसेवकांची बैठक झाली.

या बैठकीस राजर्षी शाहू आघाडीच्या (मदन कारंडे गट) नगरसेविका सौ.अंजली जाधव व त्यांचे पती मदन जाधव उपस्थित होते. याबरोबरच काँग्रेसच्या नगरसेविका सौ. सायली लायकर यांच्यासह सौ. वर्षा जोंग व त्यांचे पती बंडू जोंग उपस्थित होते.

मदन जाधव हे आ. विनायक मेटे यांचे भाचे असून त्यांच्या माध्यमातून व आ. चंद्रकांत पाटील यांच्या चर्चेनंतर जाधव हे आवाडे गटात सामील झाल्याची चर्चा आहे. त्यांच्या माध्यमातून इतर काही सदस्यही लवकरच आवाडे यांच्या गोटात सामील होणार असल्याची चर्चा आहे. महाडिक गटाचे इचलकरंजीतील प्रमुख जयराज पाटील यांच्याकडूनही मोर्चेबांधणी सुरू आहे. पालकमंत्र्यांचे समर्थकही इचलकरंजीत गेल्या काही दिवसांपासून तळ ठोकून आहेत. तीन नगरसेविकांनी उघडपणे ताराराणी आघाडीतील महाडिक यांच्या बैठकीत उपस्थिती लावल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पाहा व्हिडिओ : मिलिंद तेलतुंबडे नक्षलवादी कसा बनला

Back to top button