राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालयातील प्राचार्यांची शंभर टक्के पदे भरण्याबाबत घोषणा केली. मात्र, शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील 137 हून अधिक अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांत पूर्णवेळ प्राचार्य कार्यरत नसल्याने शैक्षणिक, प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे.
शैक्षणिकद़ृष्ट्या महाविद्यालयाचे प्राचार्य हे महत्त्वाचे पद आहे. शैक्षणिक व प्रशासकीय जबाबदार्या प्राचार्यपदावरील व्यक्तीस पार पाडाव्या लागतात. सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित 276 महाविद्यालये आहेत. त्यामध्ये 133 अनुदानित महाविद्यालये असून 47 प्राचार्यांची पदे रिक्त आहेत. खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांतील 90 हून अधिक पदे रिक्त आहेत.
गेल्या वर्षी प्राचार्य संघटनेच्या वतीने शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला. फेब—ुवारी 2020 मध्ये मंत्री सामंत यांच्या समवेत प्राचार्य महासंघाची बैठक झाली. त्यावेळी राज्यातील सर्वच महाविद्यालयांतील प्राचार्यांचे शंभर टक्के पदे भरण्याचा आग्रह धरण्यात आला होता. त्याअनुषंगाने उच्च शिक्षण विभागाने शंभर टक्के प्राचार्य पदभरतीचा आदेश काढला आहे.
राज्य सरकारने शंभर टक्के प्राचार्यांची पदे भरण्यास मान्यता दिली असून आदेश काढला आहे. त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही सुरू झाली आहे.
– डॉ. हेमंत कटरे, सहसंचालक, विभागीय उच्च शिक्षण कार्यालय
शासनाकडे शंभर टक्के पदभरतीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने पदभरती सुरू झाली आहे. प्रशासन चालवण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.
– डॉ. व्ही. एम. पाटील, सचिव, शिवाजी विद्यापीठ प्राचार्य संघटना