कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : टोकन पोहोच, फायनल आकडा नंतर… | पुढारी

कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : टोकन पोहोच, फायनल आकडा नंतर...

कोल्हापूर : संतोष पाटील

विधान परिषदेच्या निवडणुकीत दिवाळी सदिच्छा आणि टोकनवरच समाधान मानावे लागेल, अशी शक्यता मतदारांमधून व्यक्त होत होती; पण आता मैदानात आर्थिकद़ृष्ट्या तुल्यबळ उमेदवार उतरले असल्याने मतदारांची दिवाळी कोरडी; पण नाताळ उत्साहात जाणार आहे. बालचमूची इच्छापूर्ती करणार्‍या सांताक्लॉजला झोळी रिकामी होण्याची भीती नसली, तरी उमेदवारांची झोळी मात्र मतदारांची ‘विश’ पूर्ण करता-करता रिती होण्याची वेळ येणार आहे. निवडणुकीत टोकाची ईर्ष्या पाहता एकूण दीडशे कोटी रुपयांपेक्षा अधिकची उलाढाल होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे.

‘इच्छापूर्ती’ करणारे उमेदवार मैदानात ( विधान परिषदेच्या निवडणूक )

सतेज पाटील आणि महाडिक आमने-सामने आल्याने मतदार खूश आहेत. उमेदवार म्हणजे इच्छापूर्ती करणारा सांताक्लॉज अशी विशेषण जाहीरपणे विधान परिषदेच्या प्रचारात जोडली जात आहेत. लाखो रुपये खर्च करून निवडून आलेली व्यक्ती विधान परिषदेसाठी मतदान करणार आहे. समोर तुल्यबळ उमेदवार असला, तरच मताचे ’मोल’ मिळेल, अशी अनेकांची भावना आहे. आतापर्यंत एकतर्फी वाटणारी निवडणूक पाटील आणि महाडिक गटाच्या ईर्ष्येच्या राजकारणामुळे रंगतदार होणार आहे. यामुळेच मतदारांसह तालुक्याचे नेते आणि आघाडीप्रमुखांचा भावही वधारणार आहे.

सहलीसाठी अशी सावधगिरी ( विधान परिषदेच्या निवडणूक )

महाविकास आघाडीने सदस्यांना सहलीवर पाठवताना काँग्रेसची सत्ता असलेले राज्य किंवा महाराष्ट्रातीलच ठिकाणांना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. भाजप आघाडीने महाराष्ट्रासह भाजपशासित राज्यांत सहलीसाठी चाचपणी सुरू केली आहे. राज्यातील सत्ताधारी सत्तेच्या आधारे मतदारांना नियोजित वेळेत मतदानासाठी पोहोचण्यात अडचणी आणू शकतील, ही भीती गृहित धरून सहलीचे ठिकाण ठरवताना काळजी घेतली जात आहे.

इतके मतदार म्हणतात आम्हाला ‘मदत’ नको

विधान परिषदेच्या मागील निवडणुकीत पाटील तसेच महाडिक गटाकडून एकही रुपया न घेता नेत्यांशी प्रामाणिक राहिलेल्यांची संख्या सुमारे 40 होती. पैसे न घेतलेल्याची नावे उमेदवारांना सहा वर्षांनंतरही तोंडपाठ आहेत. यंदाच्या निवडणुकीत आतापर्यंतच्या प्रचारात ’आम्हाला पैसे नको’ असे म्हणणारे दोन्ही बाजूला 15 मतदार पुढे आल्याचे बोलले जाते.

टोकन पोहोच, फायनल आकडा नंतर…

मताचा नेमका आकडा अद्याप ठरलेला नसला, तरी टोकन पोहोच केली जात आहे. अनेकजण दोन्ही घरचा पाहूणचार घेणारेही आहेत. चुरस वाढेल तसा आकडाही वाढणार आहे. दोन्ही बाजूंकडून मतदारांना सहलीवर पाठवण्यासाठी आराखडे तयार आहेत. आलिशान हॉटेलमध्ये राहण्यासह इच्छाभोजन आणि खरेदीचा मनसोक्त आनंद मतदारासह कुटुंबीयांना उपभोगता येईल, याची जोडण्या घालण्यात शिलेदार मग्न आहेत. टोकनसह अंतिम हिशेब आणि पाहुणचाराच्या खर्चासह ही निवडणूक दीडशे कोटींचा टप्पा सहज ओलांडेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

इचलकरंजीवर फोकस

इचलकरंजी; संदीप बिडकर : विधान परिषद निवडणूक मतदानासाठी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नगरसेवकांची संख्या इचलकरंजी नगरपालिकेत आहे. सध्या नगराध्यक्षांसह 68 नगरसेवक मतदानासाठी पात्र आहेत. एक मयत आहे. पालकमंत्री सतेज पाटील व माजी आमदार अमल महाडिक यांच्यात लढत होणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर इचलकरंजीमध्ये कारभार्‍यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

विधान परिषद निवडणुकीनंतर लगेचच नगरपालिकेची निवडणूक लागणार आहे. त्यामुळे विधान परिषदेतील जय-पराजयाचे व बदललेल्या राजकीय समीकरणाचा परिणाम पालिका निवडणुकीवर होणार आहे. मंत्री पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शहरात महाविकास आघाडीतील नगरसेवकांची भेट घेतली होती. त्या अनुषंगाने महाडिक समर्थकही नगरसेवकांच्या संपर्कात आहेत.

मंत्री सतेज पाटील यांनी आपल्या प्रचारास सुरुवात केली आहे. त्यांचे कारभारीही नगरसेवकांच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (जांभळे, कारंडे गट), शिवसेना आदींसह त्यांना स्थानिक सागर चाळके यांच्या ताराराणी आघाडीनेही पाठिंबा दिला आहे. त्याअनुषंगाने सध्यातरी मंत्री पाटील यांच्याकडे 37 नगरसेवकांचे बळ कागदावर दिसते. माजी आ. अमल महाडिक यांना भाजपचे 16 व माजी आ. प्रकाश आवाडे यांनी पाठिंबा दिल्यानंतर एकूण 30 नगरसेवकांचे बळ मिळू शकते. हुपरी न. पा. व पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये आ. आवाडे यांना मानणारा गट आहे. महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेले काही नगरसेवक हे सवतासुभा मांडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे गटप्रमुखांचा आदेश कितपत मानला जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आ. प्रकाश आवाडे यांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात

ताराराणी पक्षाची स्थापना केल्यानंतर आ. आवाडे यांच्याबरोबर काँग्रेसचे बहुतांश नगरसेवक गेले आहेत. हुपरी नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितींमध्येही आ. आवाडे यांचे प्राबल्य आहे. मंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात जि. प. सदस्य राहुल आवाडे यांच्या नावाचीही चर्चा होती. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने अद्यापर्यंत आ. आवाडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांच्या भूमिकेनंतरच इचलकरंजीसह परिसरातील मतदानाची नेमकी परिस्थिती लक्षात येईल.

धनंजय महाडिक आज दौर्‍यावर

माजी खासदार धनंजय महाडिक हे आज (दि. 19) इचलकरंजी शहरात भेटीसाठी येत आहेत. सकाळी दहा वाजता आ. प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्ष कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये आ. प्रकाश आवाडे उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर वखारभाग येथे भाजपच्या नगरसेवकांची व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी आदींसह भाजपचे व सहयोगी पक्षाचे नगरसेवक उपस्थित राहणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी दिली.

इचलकरंजी पालिकेतील पक्षीय बलाबल

पक्ष                                नगरसेवक
भाजप                               16
काँग्रेस                              19 (पैकी 14 आवाडे गट)
राष्ट्रवादी (जांभळे गट)           8 (पैकी 1 मयत)
शाहू आघाडी (कारंडे गट)    11
ताराराणी आघाडी               13 (2 फरार)
शिवसेना                            1

हुपरीत अपक्षांसह आघाडीच्या नगरसेवकांना महत्त्व

हुपरी; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषद निवडणुकीसाठी हुपरी नगरपालिकेतील अपक्ष आणि आघाडीच्या नगरसेवकांना महत्त्व प्राप्त झाले आहे. गुरुवारी भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी या नगरसेवकांची भेट घेतली. सहा ते आठ नगरसेवकांनी हुपरीच्या विकासाची हमी देणार्‍या उमेदवाराला साथ देणार असल्याचे दौलत पाटील यांनी सांगितले.

हुपरी पालिकेत भाजपचे 9, ताराराणी आघाडी आवाडे गट 6, शिवसेना 2, ग्रामदैवत अंबाबाई आघाडी 2, अपक्ष 2 असे बलाबल आहे.

भाजप आणि महाआघाडी अशी लढत झाली, तर भाजपला जादा मते येथे मिळू शकतात. त्यामुळे अपक्ष आणि अंबाबाई आघाडीच्या 4 नगरसेवकांना महत्त्व प्राप्त होणार आहे. गुरुवारी महाडिक यांनी गटनेते दौलत पाटील, भाजपचे माजी उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे, नगरसेवक संदीप वाईंगडे, अमर गजरे, रवींद्र नलवडे, शिवसेनेचे राजेंद्र पाटील यांची भेट घेतली. यावेळी माजी सरपंच दिनकरराव ससे, किरण पोतदार, रविशंकर चिटणीस आदी उपस्थित होते.

Back to top button