राधानगरी (Radhanagari) तालुक्यातील वाकीघोल परिसरामध्ये गेले पंधरा दिवस बिबट्याने धुमाकूळ घातला असून आठवड्याभरात चाफोडी, हाळ्याचीवाडी येथील दोन गायींचा फडशा पाडला आहे आणि एका गाईला गंभीर जखमी केले आहे. शेतकऱ्यांच्या अनेक शेळ्यामेंढ्या आणि पाळीव कुत्रीही फस्त केली आहेत. या परिसरातील शेतकरी बिबट्याच्या दहशतीखाली असून त्यांचे शेतीकामाचे दैनंदिन वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. वनविभागाने सापळा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
काळम्मावाडी जलाशयामुळे राधानगरी (Radhanagari) तालुक्यातून भौगोलिक दृष्ट्या एकाकी पडलेला वाकीघोल परिसर हा डोंगर, दर्या आणि जंगल परिसरात वसलेला आहे .तिन्ही बाजूनी विस्तीर्ण जंगल आणि एका बाजूला काळम्मावाडी जलाशयाचे पाणलोट क्षेत्र अशी या परिसराची भौगोलिक रचना आहे. परिसरातील शेतकऱ्यांना जंगली श्वापदांचा नेहमीच उपद्रव असतो. तुटपुंजी शेती आणि दुग्ध व्यवसाय हा परिसरातील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार आहे.
मागील पंधरा दिवस या परिसरात मानवी वस्ती नजीक बिबट्याचा वावर वाढला आहे. पहिल्या टप्प्यात शेळ्यामेंढ्या आणि पाळीव कुत्री फस्त केलेल्या बिबट्याने हाळ्याचीवाडी येथील दशरथ खांडेकर यांच्या गायरानात चरायला गेलेल्या गाईला गेल्या आठवड्यात ठार केले. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्या दुसऱ्या गाईवर हल्ला करून तिलाही गंभीर जखमी केले. चाफोडी येथील श्रीमती नानुबाई कांबळे यांच्या चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या गायीचा अर्धवट मृतदेह चाफोडी-वाडदे दरम्यान असलेल्या नाळवा नावाच्या शेतात बुधवारी आढळून आला असून बिबट्यानेच या गाईचा फडशा पाडल्याचे स्पष्ट झाले आहे.
या बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थांनी गुरे चारायला सोडण्याचे बंद केले असून शेतात जाण्यास ही शेतकरी धजावत नाहीत, अशी परिस्थिती आहे. वन विभागाने या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा आणि आपदग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी चाफोडीचे उपसरपंच सखाराम बेतम यांनी केली आहे.
हे वाचलंत का ?