सरवडे; पुढारी वृत्तसेवा : गत हंगामातील ऊसाला ४०० रु. प्रतिटन ज्यादा दर व चालू गळीत हंगामाला ३५०० रु. प्रतिटन दर दिल्याशिवाय कोणत्याही साखर कारखान्याला ऊस तोड करु देऊ नये. अन्यथा ऊसतोडी बंद पाडू व रस्त्यावर ऊस भरलेले एकही वाहन सोडू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे.
राधानगरी तालुक्यातील दूधगंगा काठच्या जवळपास २२ गावांमधील ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व ग्रामस्थांना ऊस दराची कोंडी फुटल्याशिवाय ऊस तोड न करण्याच्या सुचना शेकडो मोटरसायकल रॅलीद्वारे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे दिला.
निवेदनात म्हटले आहे की, साखर कारखानदार ऊस उत्पादक शेतकर्यांना घामाचे दाम न देता त्यांच्या टाळूवरचे लोणी खात आहेत. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ऊसाला ज्यादा दर व शेतकऱ्यांना हक्काची किंमत देण्यासाठी राज्यभर ऊसदर आंदोलनाचे रान उठवले आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सहभागी झाले पाहिजे. साखर कारखानदारांनी उपपदार्थातून मिळवलेले करोडो रुपये आपल्या घशात न घालता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यासाठी भाग पाडू या आणि इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकर्यांनी गावोगावी मोटरसायकल रँलीद्वारे जनजागृती करण्यात आली.