राज्‍यातील भूपृष्‍ठांची पाण्यासाठी चाळण; दरवर्षी दीड लाखांवर कूपनलिकांची खोदाई

कूपनलिकांची खोदाई
कूपनलिकांची खोदाई
Published on
Updated on

कोल्हापूर : सुनील कदम सिंचनासह अन्य कारणांसाठी राज्यात दरवर्षी साधारणत: दीड लाखांहून अधिक कूपनलिका खोदल्या जात आहेत. त्याशिवाय राज्यात दरवर्षी 25 हजारांवर विहिरींचीही भर पडत आहे. परिणामी, दिवसेंदिवस राज्याच्या भूपृष्ठाची जणूकाही चाळण होताना दिसत आहे.

'ग्रॅव्हिटी रिकव्हरी अँड क्लायमेट एक्सपेरिमेंट' या जागतिक कार्यक्रमांतर्गत भारतातील भूजलाच्या उपशाची आकडेवारी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार देशात तब्बल 2 लाख 50 हजार दशलक्ष घनमीटर इतके भूजल उपसण्यात येते. संपूर्ण जगात उपसण्यात येणार्‍या एकूण भूजलाच्या तब्बल 25 टक्के इतके हे प्रमाण आहे. भारताचे क्षेत्रफळ जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या केवळ अडीच टक्के इतके आहे आणि केवळ अडीच टक्के क्षेत्रासाठी जगातील एकूण एक चतुर्थांश भूजल उपसले जाते. 2 लाख 45 हजार दशलक्ष घनमीटर भूजल म्हणजे 86 कोयना धरणे भरतील इतके भूजल देशात एकावर्षी उपसले जाते. अर्थात यातही पुन्हा महाराष्ट्रच आघाडीवर असल्याचे दिसते. राज्यात आजघडीला 20 लाखांवर विहिरी आणि 42 लाखांहून अधिक कूपनलिका आहेत. बहुतांश कूपनलिका या शेतीच्या सिंचनासाठी वापरात येत असल्या तरी घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी खोदाई करण्यात येत असलेल्या विहिरींची संख्याही लक्षणीय आहे.

टाटा ऊर्जा संशोधन संस्थेने केलेल्या अभ्यासातून असे निश्चित झाले आहे की, देशात वार्षिक 15,255 टीएमसी पाणी भूपृष्ठाखाली उपलब्ध होत असते. आज राज्यातील 358 तालुक्यांपैकी 174 तालुके हे कायमस्वरूपी दुष्काळी समजले जातात. राज्यातील हे 174 तालुके म्हणजे जवळपास निम्मा महाराष्ट्र आज सर्वच प्रकारच्या पाणी वापराच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात भूगर्भातील पाणी साठ्यावर विसंबून आहे. राज्यात दरवर्षी 753 टीएमसी भूगर्भातील पाण्याचा उपसा होतो, म्हणजे कोयना धरणासारखी सात धरणे भरतील एवढा पाणीसाठा महाराष्ट्र दरवर्षी भूगर्भातून उपसतो आहे आणि वर्षानुवर्षे हे प्रमाण वाढतच चालले आहे. परिणामी, कधीकाळी 20-25 फुटांवर असणारी भूगर्भातील पाणीपातळी आज 200 ते 250 फुटांच्याही खाली गेली आहे.

यंदा राज्याच्या बहुतांश भागात पावसाने ओढ दिल्यामुळे सिंचनासह अन्य वापराच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात विहिरी आणि कूपनलिकांची खोदाई सुरू झालेली दिसत आहे. राज्यात आजघडीला 20 लाखांहून अधिक विहिरी आणि 42 लाखांहून अधिक विहिरी आहेत. त्यात दरवर्षी 25 हजारांवर विहिरी आणि 1.50 लाखांच्या घरात कूपनलिकांची भर पडताना दिसत आहेत. सध्या कुणी विहीर काढावी आणि कुणी कूपनलिकांसाठी खोदाई करावी, याबाबत शासकीय पातळीवर कोणतेही निकष नसल्यामुळे प्रामुख्याने कूपनलिकांची बेसुमार वाढ होताना दिसत आहे.

राज्यातील भूजल प्रदूषित होण्याचा मोठा धोका!

राज्यातील शेतजमिनीतील रासायनिक खतांचा वार्षिक वापर हा 40 लाख 32 हजार 500 टनांपर्यंत गेला असून, वर्षानुवर्षे त्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. शेतामध्ये वापरलेल्या रासायनिक खतांचे अंश मोठ्या प्रमाणात पाझरून भूजलात मिसळताना दिसत आहेत. परिणामी, अनेक कूपनलिका आणि विहिरींचे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. नागरी वस्त्यांमधील कूपनलिकांमध्ये सांडपाणी मिसळून त्यांचे पाणी प्रदूषित होण्याचे प्रमाणही वाढत चाललेले आहे. अशा परिस्थितीत कूपनलिकांची संख्या बेसुमारपणे वाढतच राहिल्याचे राज्यातील सगळे भूजलच प्रदूषित होण्याचा धोका पर्यावरण तज्ज्ञांमधून व्यक्त होत आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news