कोल्हापूर : सहायक प्राध्यापकांच्या 1,298 जागा रिक्त! | पुढारी

कोल्हापूर : सहायक प्राध्यापकांच्या 1,298 जागा रिक्त!

कोल्हापूर : प्रवीण मस्के

महाविद्यालयातील प्राध्यापक भरती बाबतची माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे दिली. यामुळे रखडलेल्या प्राध्यापक भरती चा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, सध्या शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात सुमारे 1,298 सहायक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहे. रिक्त जागा व शासन निर्णयात मोठी तफावत असल्याने पात्रताधारकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

राज्यातील विद्यापीठे व अनेक महाविद्यालयांमध्ये मोठ्या संख्येने विविध विषयांची सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) वेळोवेळी याबाबत सूचना केल्या आहेत. मात्र, कोरोना व त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पदभरतीची प्रक्रिया लांबणीवर पडली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापकांच्या पहिल्या टप्प्यातील 2,088 प्राध्यापक भरती व सर्व प्राचार्य पदे भरण्याला मान्यता देण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी दिली आहे.

2013 पासून राज्यात प्राध्यापक भरती झालेली नाही

राज्यात 2013 पासून प्राध्यापक भरती नियमितपणे झालेली नाही. महाविद्यालयातील 40 ते 50 टक्के प्राध्यापकांच्या जागा रिक्त असल्याने शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अनुदानित महाविद्यालयात सहायक प्राध्यापकांची सुमारे 1298 पदे रिक्त आहेत. प्राध्यापक भरती व्हावी म्हणून नेट-सेटधारक व पीएच. डी. पदवी मिळविलेल्यांनी पाठपुरावा केला होता. युती सरकारने 40 टक्के भरतीनुसार 3580 पदे भरण्याचा निर्णय झाला. त्यातील सुमारे प्राध्यापकांची 1100 पदे भरण्यात आली. अद्याप 2400 पदे भरणे अपेक्षित आहेत. परंतु, महाविकास आघाडी सरकारने 2088 पदे भरतीचा निर्णय घेतला आहे. आणखी 312 पदे रिक्त ठेवल्याने पात्रताधारकांमध्ये नाराजीची भावना आहे.

पात्रताधारकांच्या बेरोजगारीत वाढ

सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक भरतीवर 4 मे 2020 च्या शासन निर्णयानुसार बंदी होती. प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याने शिक्षणाचा दर्जा खालावला आहे. दहा वर्षांपासून सलग रिक्त प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया न झाल्याने सेट, नेट व पीएच. डी. पात्रताधारकांच्या बेरोजगारीत वाढ झाली आहे. त्यामुळे प्राध्यापक भरती प्रक्रियेचा शासन निर्णय तत्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.

राज्यात सुमारे 13 हजार प्राध्यापक पदे रिक्त असताना पहिल्या टप्प्यात 2088 पद संख्या भरण्याचा शासनाने घेतलेला निर्णय नगण्य आहे. त्यामुळे दुसरा टप्पा नजीकच्या काळात घोषित होईल व उर्वरित 100 पदे भरली जातील, अशी अपेक्षा आहे.
– डॉ. किशोर खिलारे,
राज्य समन्वयक, प्राध्यापक भरती लक्ष्यार्थ आंदोलन

Back to top button