सीपीआर मधील जळीतग्रस्तांच्या नातेवाईकांना मदत कधी? | पुढारी

सीपीआर मधील जळीतग्रस्तांच्या नातेवाईकांना मदत कधी?

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

नगर जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडवात 11 जणांचा बळी गेला. यात सहा जणांचा गुदमरून, तर पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 6 नोव्हेंबर) घडली. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 7 लाख रुपयांची मदत आरोग्य विभागाने जाहीर केली. प्रातिनिधिक स्वरूपात एका कुटुंबाला धनादेशही दिला. अशीच घटना सीपीआर च्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये 28 सप्टेंबर 2020 रोजी घडली होती. येथे झालेल्या स्फोटात तीन रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेला वर्ष सरले तरी एक रुपयाची मदत मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून मिळालेले नाही. ‘नगरमध्ये होरपळलेली ती माणसंच होती; सीपीआर मधील नव्हती का,’ असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

सीसीटीव्ही बंद होता की बंद केला

नगरमधील अग्नितांडवाची वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन तगडी चौकशी समिती नेमली आहे. सात दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत; पण कोल्हापूरच्या सीपीआर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये झालेल्या स्फोटाची चौकशीचे धाडस वरिष्ठ पातळीवर का झाले नाही. या स्फोटाची चौकशी करण्यासाठी स्थानिक पातळीवर चौकशी समिती नेमली. या समितीचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात आहे. स्फोटाचे नेमके कारण काय, कशामुळे हा स्फोट झाला, स्फोटात तीनच रुग्ण दगावले की अन्य किती, फायर ऑडिटचे काय, व्हेंटिलेटर उपलब्ध नसताना त्या रुग्णांवर उपचार झालेत कसे, या स्फोटाला जबाबदार कोण, चौकशीला विलंब का, सीसीटीव्ही बंद होता की बंद केला, त्या रात्री वॉर्डात डॉक्टर, परिचारिका होते का, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहोत.

कोरोना संकटकाळात सीपीआर पूर्ण वेळ कोरोनाबाधितांच्या सेवेत होते. जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर 2020 मध्ये कोरोनाचा उद्रेक झाला. बाधितांना उपचारासाठी बेड, ऑक्सिजन व्हेंटिलेटरही मिळत नव्हते. याच दरम्यान सीपीआरच्या ट्रॉमा केंअर सेंटरमध्ये स्फोट होऊन आग लागली. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांनी आगीत तिघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. प्रत्यक्ष या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला.

कोरोनासाठी राखीव असल्याने कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगत नुकसानभरपाईच्या प्रश्नाला बगल दिली आहे. चौकशी समितीमधील सदस्य याचा अहवाल शासनाला दिल्याचे सांगतात. मात्र, या घटनेबाबत सीपीआर प्रशासन स्पष्ट बोलत नाही. यावरूनच चौकशी समिती आणि सीपीआर प्रशासनाने हा अहवाल गुंडाळल्याची चर्चा सुरू आहे.

मृत्यू सहा; नोंद केवळ दोनच!

दै.‘पुढारी’ने सीपीआरच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये स्फोट होऊन तीन जणांचा मृत्यू झाल्याचे सर्वप्रथम वृत्त ऑनलाईन प्रसिद्ध करून सीपीआरचा भांडाफोड केला. यानंतर अधिष्ठाता डॉ. मस्के यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे तीन जणांचा मृत्यू झाल्याचे प्रसारमाध्यमांना कळविले. स्फोटात मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती डॉ. मस्के यांनी का लपविली, हा संशोधनाचा विषय आहे. ट्रॉमा केअर सेंटरमध्ये झालेल्या स्फोटात सहाजणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांत मात्र दोनच मृत्यूची नोंद झाली आहे.

चौकशी समितीचा अहवाल अन् घटनेवर पडदा

सीपीआरमध्ये वर्षातून एखादी दुसरी घटना घडतेच. घटना घडली की, प्रशासन त्यावर सारवासारव करते. प्रकरण वाढू नये म्हणून स्थानिक चौकशी समिती नेमते. चौकशी समिती सोपस्कार अहवाल बनविते आणि घडलेल्या घटनेवर पडदा टाकते. त्यामुळे ट्रॉमा केअर सेंटरमधील घटना आणि तेथील चौकशी अहवाल समितीला नवीन नाही.

Back to top button