road accident : ट्रक खाली चिरडून दोघा कॉलेज युवकांचा जागीच मृत्यू | पुढारी

road accident : ट्रक खाली चिरडून दोघा कॉलेज युवकांचा जागीच मृत्यू

चंदगड; पुढारी वृत्तसेवा : road accident : आसगोळी (ता. चंदगड, जि. कोल्हापूर ) गावानजीक ट्रक खाली चिरडून सातवणे येथील जय जोतिबा मासरणकर (वय १८) आणि अजित आप्पाजी पाटील (वय १९) या कॉलेज युवकांचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात चंदगड-गडहिंग्लज मार्गावर झाला.

अधिक माहिती अशी की, जय व अजित हे आपल्या दुचाकी (क्र. एमएच ०९- ९४२९) वरून अडकुर हून इलेक्ट्रिक साहित्य घेऊन आपल्या सातवणे गावी येत होते. दरम्यान आसगोळी पोल्ट्री फार्म जवळच्या एका अवघड वळणावर अडकुर हून उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना पुढच्या ट्रॉलीला हळुवार धडक बसताच दोघेही रस्त्यावर आपटले. याचवेळी नागणवाडीहून अडकुरच्या दिशेने जाणारा ट्रक (क्र. एमएच ०४- ए – ६१६८ ) दोघांच्याही अंगावरून सुसाट गेला. यावेळी दोघांच्याही डोक्यावरून चाके गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला.

जय हा दुचाकी चालवत होता. तर अजित हा पाठीमागे बसला होता. जय हा चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात बी. कॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. तर अजित हा महागाव येथील कॉलेजमध्ये डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात होता. जय याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे, तर अजितच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.

Back to top button