‘ईडी’पुढे महिलेचे धाडस; कर्ता पुरुष पुढे आला नाही : शरद पवार

‘ईडी’पुढे महिलेचे धाडस; कर्ता पुरुष पुढे आला नाही : शरद पवार
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरला शौर्याची परंपरा आहे. 'ईडी'च्या अधिकार्‍यांसमोर येत एक महिला आमचे चुकले असेल तर स्वत:ला गोळ्या घाला म्हणते; मात्र त्या घरातील कर्ता पुरुष गप्प बसतो. एवढेच नव्हे तर पुढे न येता ईडीच्या दरबारात जाऊन बसतो. भाजपमध्ये जाऊन ते म्हणतील तिथे बसून आपली सुटका करून घेण्याची भूमिका त्यांनी घेतली, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केली. समाजातील कोणताही घटक सरकारवर समाधानी नाही, महिलाही सुरक्षित नाहीत. अशा सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी दसरा चौकात आयोजित केलेल्या जाहीर निर्धार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू महाराज होते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार यांची ही पहिलीच सभा असल्यामुळे पवार काय बोलणार, याची उत्सुकता होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना ईडीने नोटिसा पाठविल्या. काहींना तुरुंगात पाठविले. मात्र त्यांनी आपला स्वाभिमान सोडला नाही. परंतू ईडीची नोटीस आल्यामुळे काहींनी आपला स्वाभिमान बाजुला ठेवून भुमिकाच बदलली. शौर्याची परंपरा असलेल्या कोल्हापुरात मात्र आपल्याला वेगळेच पहावयास मिळाले. ईडीच्या अधिकार्‍यांसमोर येऊन एक महिला आम्हाला गोळ्या घाला म्हणत, अशावेळी घरच्या कर्त्या पुरुषाने पुढे येणे आवश्यक होते. परंतू ते गप्प बसले. आणि भाजपसोबत जाऊन आपली सुटका करून घेतली, असा टोला पवार यांनी हाणला.

शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत आहेत. बेरोजगार तरुणांची फौज वाढत आहेत. महिला सुरक्षीत नाहीत. अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. या सरकारला खाली खेचण्यासाठी साथ द्या, असे आवाहनही पवार यांनी केले. ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवराय व शाहूरायांनी सत्ता रयतेसाठी राबवायची असते हे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. असत्याचे आणि ढोंगीपणाचे त्यांनी कधी समर्थन केले नाही. आज देशात नेमकी याच्या उलट परिस्थिती आहे. सत्तेचा वापर जनतेसाठी होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्त्या वाढत आहे. बेकारी, महागाई वाढत आहे. मणीपूरमध्ये महिलांबाबत घडलेल्या घटनांकडे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाही. चंद्रावर यान पाठवून भारताने जगात नाव मिळवले असले तरी देशातील महिला मात्र असुरक्षीत आहेत, अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकारी नाही, असेही ते म्हणाले.

पुरोगामी एकत्र आल्यास देशातील चित्र बदलेल पक्षांतरबंदी कायदा कडक करण्याची गरज : शाहू महाराज

फुले, शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने काम करणार्‍या सर्व घटकांनी एकत्र येऊन काम केल्यास देशातील चित्र बदलण्यास मदत होईल. स्वाभिमानाने पुरोगामी विचाराने पवार लढत आहेत. त्यांना सर्वांनी साथ द्यावी. कोल्हापुरात जे घडते ते पुढे देशात घडते. सध्या महाराष्ट्रात जे घडत आहे, ते थांबविण्यासाठी पक्षांतरबंदी कायद्यात बदल करणे आवश्यक आहे. तो अधिक कडक करण्याची गरज असल्याचे शाहू महाराज यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.

महागाई, बेरोजगारी, शेतकर्‍यांच्या प्रश्नांना बगल देवून थोर पुरुषांचा अवमान करून लोकांची दिशाभुल केली जात आहे. सत्तेचा गैरवापर करत खोके देऊन, ईडीची भिती दाखवून आमदार फोडणार्‍यांना रोखण्यासाठी पुरोगामी विचाराला साथ द्यावी, असे आवाहन आ. अनिल देशमुख यांनी केले.

समतेची, पुरोगामी भूमी म्हणून ओळखण्यात येणार्‍या कोल्हापुरातील गद्दारांना ठेचण्यासाठी कोल्हापुरी चप्पल हातात घ्यावे, असे आ. जितेंद्र आव्हाड म्हणाले.

आमदार रोहित पोवार म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष फुटलेला नाही. राष्ट्रवादी पक्ष एक विचारधारा आहे. प्रतिगाम्यांना त्यांची जागा दाखविण्यासाठी स्वाभिमानी विचारांच्या राष्ट्रवादीला बळ देण्याचे आवाहन आ. रोहित पवार यांनी केले.

महाराष्ट्राच्या मातीने नेहमीच दिल्लीला पाणी पाजल्याचे ऐतिहासिक संदर्भ आहेत. त्याची पुनरावृत्ती 2024 च्या निवडणुकीत होईल, असा विश्वास रोहित आर. पाटील यांनी व्यक्त केला.

अन्नधान्य, दागदागिने लुटणारी पुर्वी डाकुंची टोळी होती, आता पक्ष पळविणारी टोळी तयार झाली आहे. द्वेषाचे राजकारण करत हुकुमशाही पद्धतीने सत्ता राबविली जात असल्याचा आरोप खा. फौजिया खान यांनी केला.

शिव-शाहू, फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांशी तडजोड न करता जातीवाद्यांना त्यांची जागा दाखविण्यासाठी राष्ट्रवादीला साथ द्यावी, असे आवाहन राजीव आवळे यांनी केले. यावेळी विकास लवांडे, रामराजे कुपेकर, अमर चव्हाण, शिवाजी खोत आदिंची भाषणे झाली.

स्वागत राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार यांनी केले. ही सभा महाराष्ट्राला भविष्यात नवी दिशा देणारी ठरेल असे त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा व स्वाभिमानी जनतेचा आपल्याला प्रतिसाद आहे. येत्या निवडणुकीत लोकभेच्या 2 आणि विधानसभेच्या 5 जागा निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. अरुण लाड, आ. बाळासाहेब पाटील, संध्यादेवी कुपेकर, प्रतिक पाटील, अशोक जांभळे, विद्या चव्हाण, शिवाजीराव नाईक, मानिसिंग नाईक आदी उपस्थित होते. आभार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मानले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news