पालकमंत्री सतेज पाटील, मंत्री मुश्रीफ यांची जिल्हा बँक, विधान परिषदेची पेरणी! | पुढारी

पालकमंत्री सतेज पाटील, मंत्री मुश्रीफ यांची जिल्हा बँक, विधान परिषदेची पेरणी!

कोल्हापूर : विकास कांबळे : पालकमंत्री सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार पी. एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांच्या जिल्हा परिषदे अध्यक्षाची माळ गळ्यात घातली. दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या विधान परिषदेची तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची पेरणी केल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर या घडामोडींमुळे महाडिक व आ. पी. एन. पाटील यांच्या राजकीय मैत्रीत दुराव्याची बीजे पेरल्याचेही समजले जात आहे.

अधिक वाचा :

गोकुळमुळे राजकीय समिकरणे बदलली

गोकुळच्या निवडणुकीने जिल्ह्यातील सर्वच राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत. या निवडणुकीत पालकमंत्री पाटील व मंत्री मुश्रीफ तसेच आ. पी. एन. पाटील आणि माजी आ. महोदवराव महाडिक यांच्यात समोरासमोर थेट लढत झाली होती.

अशा परिस्थिती जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत राहुल पाटील यांच्या एंट्रीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

अधिक वाचा :

जिल्हा परिषदेत अध्यक्ष निवडीचे वारे वाहू लागल्यानंतर राहुल पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांची भेट घेतली आणि तेथून ते ‘अजिंक्यतारा’वर गेले. पालकमंत्री पाटील यांचीही त्यांनी भेट घेतली.

हा भेटीचा कार्यक्रम सुरू असताना त्याच दिवशी मंत्री मुश्रीफ यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचाच असेल, अशी घोषणा करून गुगली टाकली. पालकमंत्री पाटील यांनीही त्याला प्रत्युत्तर देताना जिल्हा परिषदेतील काँग्रेसची सदस्य संख्या पाहता जिल्हा परिषद अध्यक्षपदावर काँग्रेसचाच हक्क असल्याचे सांगितले.  त्यानंतर त्यांच्यामध्ये काही दिवस अध्यक्षपदावरून ताणाताणी सुरू झाली.

जसा महाडिक यांचा गोकुळवर जीव तसा मुश्रीफांचा जिल्हा बँकेवर

पालकमंत्री सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ
पालकमंत्री सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ

गोकुळवर जसा महाडिक यांचा जीव आहे तसाच जिल्हा बँकेवर मंत्री मुश्रीफ यांचा जीव आहे. ही बँक वाढावी, मोठी व्हावी, शेतकर्‍यांचा विकास व्हावा यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते.

गोकुळच्या निवडणुकीचा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर परिणाम होणार हे स्वाभाविक आहे.

अधिक वाचा :

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करायची असेल तर आ. पाटील व माजी आमदार महाडिक यांना वगळून ते शक्य नाही, हे मंत्री मुश्रीफ यांना देखील माहीत आहे.  बँकेच्या आगामी निवडणुकीत त्यांची मदत मिळविण्यासाठी त्यांच्यासाठी ही आयती संधी होती.  या संधीचा फायदा उचलण्याचे ठरविले आणि शेवटच्या क्षणापर्यंत अध्यक्ष निवडीचे प्रकरण ताणून धरले.

पालकमंत्र्यांना विधानपरिषद महत्वाची

पालकमंत्री पाटील यांना विधान परिषद महत्त्वाची आहे. विधान परिषदेची निवडणूकही तोंडावर आली आहे.

या निवडणुकीचे त्यांना जरी ‘तंत्र’ अवगत झाले असले तरी विरोधकांची संख्या किंवा विरोध वाढू नये याची सध्या ते खबरदारी घेताना दिसत आहेत. जिल्हा परिषद सदस्य असो किंवा महापालिकेतील नगरसेवक असो, निधी देताना फारसा भेदभाव होताना दिसत नाही.

जो मागेल त्याला निधी देण्याचा ते प्रयत्न करत आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपदावर काँग्रेसचा हक्क जरी त्यांनी सांगितला.

तरी जिल्हा परिषद अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच जाणार होते हे त्यांना माहीत होते.

आ. पी. एन. पाटील यांनी या पदासाठी आग्रह धरल्यानंतर मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे बोट दाखविल्याची चर्चा होती.

आ. पी. एन. पाटील यांनी पालकमंत्री पाटील व मंत्री मुश्रीफ यांची एकत्र भेट घेतली. त्यांची ही बैठक पाऊण तास चालली.

एवढा वेळ चाललेल्या बैठकीत केवळ अध्यक्षपदापुरती चर्चा झाली असे सांगण्यात येत असले तरी ते पटण्यासारखे नाही.

या बैठकीत आगामी जिल्हा बँक निवडणूक असेल किंवा विधान परिषद असू शकते.

सहकारी संस्थांच्या निवडणुका असतील, त्यावर अजिबात चर्चा झाली नसेल, असे म्हणणे न पटण्यासारखे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अचानक यू टर्न घेत जिल्हा परिषद अध्यक्षपद काँग्रेसकडेच ठेवण्याबाबत घेतलेल्या निर्णयावर देखील उलटसुलट चर्चा सुरू आहे.

…अन् आ. पी. एन. पाटील झाले सक्रिय

पालकमंत्री पाटील व मंत्री मुश्रीफ यांची गट्टी संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. त्यांचे सहमतीचे राजकारण न समजण्याइतके आ. पी. एन. पाटील नवखे राजकारणी नाहीत. त्यांनी यावेळी आपल्या मुलाला अध्यक्ष करण्यासाठी कंबर कसली आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत सक्रिय झाले. ते सक्रिय होण्याचीच पालकमंत्री पाटील व मंत्री मुश्रीफ प्रतीक्षा करत होते. ते सक्रिय झाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीने वेगळे राजकीय वळण घेण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा : 

Back to top button