धामोड; पुढारी वृत्तसेवा : केळोशी बुद्रुक ता राधानगरी येथे तरस प्राण्यांनी शेळीच्या कळपावर केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. (केळोशी बु ॥) सतिचा माळ येथील शेतकरी प्रकाश कांबळे यांचे जंगलाजवळ शेत आहे. या परिसरात शेळ्या चारत असताना अचानक दोन तरसांनी शेळ्यांच्या कळपावर हल्ला केला व दोन शेळ्या जंगलात ओढून नेल्या. प्रकाश कांबळे यांनी आरडा ओरडा करत आसपासचे शेतकरी जमा केले व जंगलात शेळ्यांचा शोध सुरु केला. यावेळी तरसांनी त्या दोन्ही शेळ्यांचा फडशा पाडला होता. यात प्रकाश कांबळे यांचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या बाबतची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वन विभागाचे अधिकारी उत्तम भिसे, जैनुल जमादार, पशु वैद्यकीय अधिकारी खाटांगळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मात्र तरसाच्या भीतीने केळोशी बु ॥ आपटाळ परिसरात घबराट निर्माण झाली असून तरसांनी मनुष्य वस्तीकडे येण्यापुर्वी वन विभागाने या परिसरात पिंजरा लावुन त्या तरसांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकरी व नागरिक करत आहेत.
हेही वाचा;