रंकाळा संवर्धनास १० कोटी मंजूर; राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याला यश | पुढारी

रंकाळा संवर्धनास १० कोटी मंजूर; राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याला यश

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहराचे वैभव असलेल्या ऐतिहासिक रंकाळा तलावाचे संवर्धन व सुशोभीकरणासाठी 15 कोटींचा आराखडा तयार केला आहे. दयनीय अवस्था झालेल्या रंकाळ्याच्या संवर्धनासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करीत होतो. या पाठपुराव्याला यश आले असून मंत्री शिंदे यांनी त्यातील पहिला टप्पा म्हणून तब्बल 10 कोटींचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

आजच शासनस्तरावर अध्यादेशही काढण्यात आला. इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्याची पहिलीच वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.

क्षीरसागर पुढे म्हणाले, कोल्हापूर शहर धार्मिक, पर्यटन, औद्योगिक व क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर आहे. तसेच शाहूकालीन कोल्हापूरच्या ऐतिहासिक सौंदर्यात भर टाकणार्‍या अनेक हेरिटेज वास्तू दिमाखात उभ्या आहेत. सध्या रंकाळा तलावाचे नैसर्गिक, पुरातन व ऐतिहासिक सौंदर्य काळाच्या आणि शहरीकरणाच्या गर्दीत झाकोळले आहे. तलावाभोवतीचे मजबूत बांधकाम कमकुवत झाले आहे. अनेक ठिकाणी कठडे ढासळलेल्या स्थितीत आहेत. रंकाळ्याच्या स्थिती अत्यंत दयनीय बनली आहे. परिणामी रंकाळा तलावाचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याची गरज निर्माण झाली होती. 10 कोटी निधीतून लवकरात लवकर संवर्धन झाल्यास रंकाळ्याचे रुपडे पालटणार आहे. यातून कोल्हापूरच्या पर्यटनालाही चालना मिळेल.

पत्रकार परिषदेला शहरप्रमुख जयवंत हारुगले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, रविकिरण इंगवले, राहुल चव्हाण, राजू हुंबे, ऋतुराज क्षीरसागर, रवी चौगुले, किशोर घाटगे आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

आराखडा असा…

  • नवीन उद्यान विकसित करून हजार लोकांच्या क्षमतेचे प्रेक्षागृह उभारणे : 2 कोटी 46 लाख
  • विद्युत रोषणाई, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे : 2 कोटी 27 लाख
  • वाहनतळ, विसर्जन कुंड, पाणपोई, शौचालये, स्केटिंग ट्रॅक, दिशादर्शक फलक : 2 कोटी 40 लाख
  • नेचर पार्क विकसित करणे : 2 कोटी 18 लाख
  • लँडस्केपिंग : 1 कोटी 55 लाख
  • रोईंग क्लब, वॉटर स्पोर्टस्, रॉक गार्डन : 1 कोटी 9 लाख
  • रंकाळा टॉवर ते तांबट कमान तलावाच्या भिंतीचे संवर्धन : 77 लाख
  • पदपथ, बेंचेस बसविणे, झाडे लावणे, कचरा कुंडी : 1 कोटी 16 लाख
  • परताळा येथील जागा विकसित करणे (रेलिंग, पेव्हिंग, कॅनल) : 57 लाख
  • पाच ठिकाणी कमानी व गेट : 52 लाख

Back to top button