कोल्हापूर महापालिका प्रशासन झोपले आहे का? डेंग्यू, चिकुनगुनियाचे थैमान - पुढारी

कोल्हापूर महापालिका प्रशासन झोपले आहे का? डेंग्यू, चिकुनगुनियाचे थैमान

कोल्हापूर ः सतीश सरीकर

कोल्हापूर महापालिका प्रशासन : कोल्हापूर शहरात डेंग्यू व चिकुनगुनियाने अक्षरशः थैमान घातले आहे. घरोघरी रुग्ण आढळत असून, नागरिक मेटाकुटीला आले आहेत. जीव नकोसा करून टाकणार्‍या अंगदुखीने बेजार झाले आहेत. महापालिका प्रशासनाला मात्र त्याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे वास्तव आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे काहींचा हकनाक बळी जाऊन त्यांची कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. शहराभोवती हळूहळू डेंग्यू व चिकुनगुनियाचा फास आवळत आहे. नागाळ पार्क व ताराबाई पार्क यांसारख्या उच्चभ्रू वसाहतींनाही विळखा पडला आहे. सार्वजनिक स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून, महापालिका प्रशासन झोपले आहे का? असा संतप्त सवाल शहरवासीयांतून उपस्थित केला जात आहे. महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांचा प्रशासनावर वचक नसल्याचेच यातून दिसून येते.

कोल्हापूर महापालिका प्रशासन : सर्वेक्षणाचे कागदी घोडे…

गेल्या काही महिन्यांपासून शहरात डेंग्यू व चिकुनगुनियाचा ‘ताप’ वाढला आहे. गल्लीबोळांतील खासगी रुग्णांच्या गर्दीने भरत आहेत. महापालिकेच्या वतीने शहरात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. परंतु; सर्वेक्षणाचे कागदी घोडे नाचवून महापालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळत असल्याचे शहरवासीयांचे मत बनले आहे. शहरात शेकडा रुग्ण असूनही हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत संख्या दिसत असल्याने महापालिकेचे सर्वेक्षण कुचकामी ठरत आहे. शहरात डासांचे साम—ाज्य निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शहरात कुठेही औषध फवारणी होत नसल्याने दिवसेंदिवस डेंग्यू व चिकुनगुनियाचे रुग्ण वाढतच आहेत. ‘महापालिका यंत्रणा सुस्त आणि डेंग्यूचे डास सुसाट’ अशी अवस्था बनली आहे. शहरात कोरोनासारखीच चिंताजनक अवस्था डेंग्यू व चिकुनगुनियाच्या तापाने झाली आहे. काही भागांना तर डेंग्यू व चिकुनगुनियाच्या डासांचा विळखा पडत आहे. प्रशासनाच्या कामातील हलगर्जीपणाचा फटका शहरवासीयांच्या जीवावर बेतत आहे. महापालिका प्रशासनाला त्याचे गांभीर्य नसल्याचे चित्र आहे. डेंग्यूने शहरवासीयांचे बळी जात असतानाही झोपलेल्या महापालिका प्रशासनाला जाग का येत नाही? असा उद्विग्न सवाल उपस्थित केला जात आहे.

नागाळा पार्कात बांधकाम खड्डा तीन वर्षे तसाच…

कोल्हापूर शहरातील नागाळा पार्कसारख्या उच्चभ्रू वसाहतीत डेंग्यूचे सद्यःस्थितीत सुमारे दोनशेहून अधिक रुग्ण आहेत. दोन रुग्णांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने परिसरात डेंग्यू डासांची दहशत पसरली आहे. विवेकानंद कॉलेजसमोर बांधकाम व्यावसायिक पत्की यांनी काही वर्षांपूर्वी इमारतीसाठी मोठ्या प्रमाणात खोदाई केली आहे. परंतु; खड्डे भरले नसल्याने त्यात पाणी साठते. परिणामी, गेले काही महिने त्यातून डासांची उत्पत्ती होऊन नागाळा पार्कात डासांचे साम—ाज्य निर्माण झाले आहे. याविषयी स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता वरवरच्या उपाययोजना करण्यात आल्या. नागाळा पार्कमध्ये ही अवस्था असेल तर शहरातील झोपडपट्ट्या व इतरत्र ठिकाणी किती बिकट परिस्थिती असेल याचा अंदाज येतो.

कोल्हापुरात डासांची दहशत

कोल्हापूर शहरात कुठेच औषध फवारणी होत नसल्याने डासांची दहशत निर्माण झाली आहे. अगोदर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुणी शिंकले किंवा खोकले तरी नागरिक संबंधिताकडे पाहून लांब जात असत. मात्र, आता डास चावू नये म्हणून नागरिक एकतर डासापासून पळून जाण्यासाठी किंवा त्याला मारण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. कारण, डासांचा चावा हा डेंग्यूचा डंख ठरू शकतो.

डेंग्यू व चिकुनगुनिया…

  • डेंग्यू व चिकुनगुनिया तापाचा प्रसार एडीस इजिप्ती या डासामार्फत होतो.
  • या डासाच्या पायांवर पांढरे पट्टे असतात. त्याला टायगर मॉस्क्युटो म्हणतात.
  • डेंग्यू व चिकुनगुनियाचे डास दिवसा चावतात.

या डासांची उत्पत्ती

साठविलेले स्वच्छ पाणी (उदा. पाण्याची टाकी, रांजण, वॉटर कुलरमधील पाणी), भंगार वस्तू (उदा. नारळाच्या करवंट्या, टायर, डबे, रिकाम्या कुंड्या, बांधकामावरील पाण्याचे उघडे साठे)

प्रतिबंधात्मक उपाययोजना…

  • तापाची साथ असल्यास त्वरित वैद्यकीय अधिकार्‍यांना कळवावे
  • संबंधित भागात धूर फवारणी करणे
  • मोठ्या पाणी साठ्यात गप्पी मासे सोडणे
  • निरुपयोगी टायर, नारळाच्या करवंट्या आदींची विल्हेवाट लावणे
  • डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करणे
  • ताप सर्वेक्षण करून प्रयोगशाळेतून खात्री करणे

 

Back to top button