कोल्हापूर मनपात आता ९२ सदस्य | पुढारी

कोल्हापूर मनपात आता ९२ सदस्य

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

राज्य शासनाच्या निर्णयानुसार कोल्हापूर महानगरपालिकेतील नव्या सभागृहातील सदस्यसंख्या वाढणार आहे. सध्या सदस्यसंख्या 81 आहे. राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतलेल्या निर्णयानुसार 17 टक्के वाढ गृहीत धरल्यास सदस्यसंख्या 92 होणार आहे. शहरी भागात झपाट्याने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज आहे.

या पार्श्वभूमीवर शासनाने महानगरपालिका व नगर परिषदांमधील नगरसेवकांच्या संख्येत वाढ केली आहे. याबाबतचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

नव्या निर्णयानुसार महानगरपालिका व नगर परिषदांमधील सदस्यसंख्या 2011 मधील जनगणनेच्या आधारावर निर्धारित केली आहे. कोरोनामुळे 2021 च्या जनगणनेचे निष्कर्ष अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. लोकसंख्यावाढीच्या सरासरी वेगानुसार 2021 ची जनगणना गृहीत धरण्यात आली आहे. सध्या महानगरपालिकांतील सदस्यसंख्या किमान 65 सदस्य व कमाल 175 इतकी आहे. नव्या निर्णयानुसार तीन ते सहा लाख लोकसंख्या असणार्‍या महानगरपालिकांमध्ये निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या 76 व कमाल संख्या 96 पर्यंत राहणार आहे.

2011 च्या जनगणनेनुसार कोल्हापूर शहराची लोकसंख्या 5 लाख 49 हजार इतकी आहे. शहरातील लोकसंख्यावाढीचा वेग दरवर्षी सरासरी दोन टक्के मानला जातो. 2011 ते 2021 या दहा वर्षांत सुमारे 20 टक्के लोकसंख्यावाढ अपेक्षित आहे. त्यामुळे या कालावधीत एक लाखाने लोकसंख्यावाढ गृहीत धरली, तर 2021 ची लोकसंख्या 6 लाख 57,180 होते. सध्या नगरसेवक संख्या 81 असून, 17 टक्क्यांनी वाढ गृहीत धरल्यास यामध्ये 11 नगरसेवकांची वाढ शक्य आहे. आगामी सभागृहात 92 सदस्य राहतील, असा अंदाज आहे. त्रिसदस्यीय प्रभागरचनेनुसार आगामी निवडणुकीसाठी 27 प्रभाग अपेक्षित आहेत. नव्या नियमानुसार प्रभागसंख्येतही वाढ होणार आहे.

नगर परिषदेत अशी असेल नगरसेवकांची संख्या

  • ‘अ’ वर्ग नगर परिषदांमध्ये परिषद सदस्यांची किमान संख्या 37 वरून 40, तर कमाल संख्या 65 वरून 75 होईल.
  • ‘ब’ वर्ग नगर परिषदांमध्ये परिषद सदस्यांची किमान संख्या 23 वरून 25, तर कमाल संख्या 37 वरून 37 इतकीच राहील.
  • ‘क’ वर्ग नगर परिषदांमध्ये परिषद सदस्यांची किमान संख्या 17 वरून 20 व कमाल संख्या 20 वरून 25 होईल.

पालिका, मनपांचे सदस्य १७ टक्क्यांनी वाढले

मुंबई : अजय गोरड
राज्यात मागील दहा वर्षांत वाढलेल्या शहरीकरणामुळे नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने मुंबई वगळता राज्यातील सर्व महानगरपालिका व नगर परिषदांमधील निवडून द्यावयाच्या सदस्यसंख्येत (नगरसेवक) 17 टक्के वाढ करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. त्यामुळे नागपुरात 5, तर उर्वरित सर्व महानगरपालिकांत सध्याच्या जागेत प्रत्येकी 11 जागांची वाढ होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. यात महानगरपालिका व नगर परिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या ‘अ’ ते ‘ड’ महानगरपालिकांतील वर्गातील सदस्यसंख्या किमान 65 सदस्य, तर कमाल 175 इतकी आहे. तर ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ नगर परिषदांमधील सदस्यसंख्या किमान 17 सदस्य, तर कमाल 65 इतकी आहे. 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर महानगरपालिका व नगर परिषदांमधील सदस्यसंख्या निर्धारित आहे. परंतु, कोरोना महामारीमुळे 2021 ची जनगणना होऊ शकली नाही, त्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. राज्यात आगामी पाच महिन्यांत 18 महानगरपालिकांत, तर किमान 300 नगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.

मागील दहा वर्षांत म्हणजेच 2011 नंतर राज्यात वेगाने शहरीकरण झालेे. 2011 ते 2021 या दशकाच्या कालावधीत लोकसंख्यावाढ सरासरी 17 टक्के गृहीत धरून अधिनियमात नमूद केलेल्या महानगरपालिका व नगर परिषदांच्या किमान सदस्यसंख्येत 17 टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता शहरी भागातील लोकसंख्या वाढल्यामुळे महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील सदस्यांची संख्या वाढणार आहे. राज्यातील एकमेव ‘अ प्लस’ असा दर्जा प्राप्त असलेल्या मुंबई महापालिकेचा कायदा वेगळा असल्याने व तेथे नगरसेवकांची संख्या यापूर्वीच अधिक ठेवल्याने तेथे नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाली नसल्याचे नगरविकास विभागातील एका अधिकार्‍याने स्पष्ट केले.

Back to top button