सरुड : पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील सर्व सहा महसूल मंडळाच्या ठिकाणी सोमवारी (दि.३) जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिली. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत हा जनता दरबार भरेल. या उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
शाहूवाडी तालुक्यातील नागरिकांच्या विविध प्रलंबित अर्जांचे तातडीने निर्गतीकरण करण्याच्या उद्देशाने महसूल प्रशासनाच्या वतीने बहुदा पहिल्यांदाच जनता दरबाराचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी मलकापूर, आंबा, बांबवडे, सरुड, भेडसगांव, करंजफेण या महसूल मंडल अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी सद्यस्थितीत प्रलंबित असणारे विविध अर्ज तसेच दरबारात नागरिकांकडून प्राप्त होणारे अर्ज यांचा जागेवरच निपटारा करण्याच्या अनुषंगाने अधिनस्त सर्व अधिकारी, कार्यालयीन व क्षेत्रीय स्तरावरील कर्मचारी या सर्वांना जनता दरबाराच्या ठिकाणी निहित वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे.
दरम्यान, जनता दरबाराबाबत प्रत्येक गाव पातळीवर सूचना फलक, ध्वनिक्षेपक तसेच दवंडी अशा व्यापक स्वरूपात प्रचार व प्रसिद्धी करण्यात यावी. त्याचप्रमाणे सदर दिवशी संबंधित महसूल मंडळातील सर्व तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, पोलीस पाटील, कोतवाल, आशा स्वयंसेविका या सर्वांनी आपापल्या मंडल मुख्यालयी उपस्थित राहून जनतेद्वारे प्राप्त आपल्या विभागाशी संबंधित अर्जावर कार्यवाही करावी. जनता दरबाराकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी माजी सदस्य व स्थानिक सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना देखील निमंत्रित करावे आणि हा जनता दरबार उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्याच्या सूचना तहसीलदार चव्हाण यांनी महसूल यंत्रणेला दिल्या आहेत.
हेही वाचा :