चिनी मालावर बहिष्कार; व्यापार्‍यांचा निर्धार | पुढारी

चिनी मालावर बहिष्कार; व्यापार्‍यांचा निर्धार

कोल्हापूर : सचिन टिपकुर्ले

चिनी मालावर बहिष्कार टाकून स्वदेशी बनावटीच्या वस्तूंचा वापर करत यंदाची दिवाळी साजरी होणार आहे. यापूर्वी दिवाळी सणात चिनी मालाचा भारतीयांकडून सर्वाधिक वापर होत होता; पण केंद्र सरकारने गतवर्षीपासून चिनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्याने व्यापारीवर्गाकडून त्याला प्रतिसाद मिळत आहे. आता ग्राहकांनी चिनी वस्तूंची मागणी करू नये, एवढीच अपेक्षा व्यापारी करत आहेत.

गेल्यावर्षी केंद्र सरकारने चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. या आवाहनाला कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने पाठिंबा दिला व देशभरातील व्यापार्‍यांना चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. याला व्यापार्‍यांनी चांगला प्रतिसाद दिला. व्यापार्‍यांनी आयात बंद केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लोकल पर वोकल’ व ‘आत्मनिर्भर भारत’ हे दोन उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले होते. चीनने आपल्या देशातील विविध धार्मिक सणांच्या निमित्ताने वापरात येणार्‍या वस्तूंची निर्मिती करून भारतीय बाजारपेठ काबीज केली होती. गणेशोत्सवातील डेकोरेशनच्या विविध साहित्यापासून दसरा, दिवाळीतील फटाकेही चीनमधून येत होते. याशिवाय किराणा, चप्पल, खेळणी, भेटवस्तू, काचेच्या वस्तू, या सर्व चीनमधून आयात होत होत्या.

या सर्व वस्तू भारतात तयार होत असतील, तर चिनी मालावर कशाला विसंबून राहायचे, असा सवाल करण्यात आला. ‘कॅट’ने आगामी दिवाळी सण स्वदेशी वस्तूंचा वापर करून साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

2001 मध्ये चिनी वस्तूंची भारतातील आयात ही 2 बिलियन डॉलर होती, आज ती 70 बिलियन डॉलर झाली आहे. वीस वर्षांत चीनच्या आयात मालात 3,500 पटीने वाढ झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स,फौंड्री, वाहन उद्योग, मोबाईल क्षेत्रात चिनी मालाचे वर्चस्व कायम आहे. अनेक क्षेत्रांत कच्चा मालावर आपल्याला चीनवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे शंभर टक्के आयात थांबवणे शक्य नसले, तरी चिनी उद्योगांना भारतीय बाजारपेठांनी टाकलेल्या बहिष्कारामुळे 70 हजार कोटींचा फटका बसला आहे.

ग्राहकांनी चायनीज वस्तू मागू नयेत : शेटे

गेल्यावर्षी केंद्र सरकारने आवाहन केल्यानंतर चिनी मालावर व्यापार्‍यांनी बहिष्कार टाकला. नवीन चिनी मालाची आवक बंद आहे. केंद्र सरकारने चिनी माल आयात केल्यास सर्वाधिक कर लावला आहे. त्यामुळे बाजारात कोणताही चायनीज माल नाही; पण ग्राहकांची चायनीज मालाची मागणी अजून कमी झालेली नाही. त्यांच्याकडून विचारणा होतच असते, त्यांनीही या वस्तूंचा आग्रह धरू नये, असे आवाहन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी केले.

Back to top button