बनावट दारू : टेम्पोच्या चोर कप्प्यात लपवले दारूचे 300 बॉक्स - पुढारी

बनावट दारू : टेम्पोच्या चोर कप्प्यात लपवले दारूचे 300 बॉक्स

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : बनावट दारू : आयशर टेम्पोमध्ये चोरकप्पे बनवून त्यातून महाराष्ट्रात आणण्यात आलेली 21 लाखाची गोवा बनावटीची दारू पोलिसांनी पकडली. सोमवारी रात्री गडिंग्लज तालुक्यातील जांभळी रोडवर ही कारवाई झाली. आयशर टेम्पो सह सुमारे 31 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

देशी विदेशी कंपन्यांच्या नावाने असणारी गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संभाजी बर्गे यांना मिळाली होती त्यांनी गडिंग्लज मधील जांभळी रस्त्यावर सापळा लावला होता. रस्त्यालगत एका आयशर टेम्पो मधून दारूचे बॉक्स उतरण्यात येत असल्याचे त्यांच्या पथकाला दिसले त्यांनी छापा टाकताच चार संशयित पळून गेले.

चोरकप्प्यात ३०० बॉक्स

आयशर टेम्पो मध्ये छताला लागून काही चोर कप्पे बनवण्यात आले होते. यामध्ये दारूचे तब्बल ३०० बॉक्स लपवून महाराष्ट्र आणण्यात आले होते. हे कप्पे पाहून पोलिसही थक्क झाले. गडिंग्लज मधून टप्प्याटप्प्याने दारू इतरत्र पुरविण्याचे संशयितांचे नियोजन पोलिसांनी उधळून लावले.

Lakhimpur Kheri violence: हजारो नागरिकांमध्‍ये तुम्‍हाला केवळ २३ साक्षीदार मिळाले? सर्वोच्‍च न्‍यायालयाने उ. प्रदेश सरकारला फटकारले

आंतरराज्य टोळीचा संशय

पोलिसांनी 300 बॉक्स पकडलेला आयशर टेम्पो हा कर्नाटकातील असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले. गोवा बनावटीची दारू कर्नाटकाच्या टेम्पोतून महाराष्ट्रात आणण्याचा हा सर्व प्रकार पाहता हा आंतरराज्य टोळीकडून होणाऱ्या तस्करीचा प्रकार असल्याचाही पोलिसांचा कयास आहे. या दृष्टीने अधिक तपास सुरू असल्याचेही यावेळी पोलीस निरीक्षक बर्गे यांनी सांगितले.

कारवाईमध्ये निरीक्षक संभाजी बर्गे, दुय्यम निरीक्षक विजय नाईक, संजय मोहिते, कर्मचारी संदीप जानकर, सचिन काळे, सागर शिंदे, राजू कोळी, जय शिनगारे, आणि मारुती पोवार यांनी सहभाग घेतला.

Back to top button