Halsiddhanath : हालसिद्धनाथ यात्रेची अमाप उत्साहात सांगता | पुढारी

Halsiddhanath : हालसिद्धनाथ यात्रेची अमाप उत्साहात सांगता

निपाणी, पुढारी वृत्तसेवा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र आप्पाचीवाडी-कुर्ली येथील श्री. हालसिद्धनाथ (Halsiddhanath) देवाच्या यात्रेची सोमवारी सायंकाळी प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमानुसार सहावा मानकरी, पुजारी व मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असणाऱ्या या यात्रेत नाथांचे अनेक धार्मिक कार्यक्रम, ढोलवादन, वालंग, गजीनृत्य, बकरा खेळणे असे कार्यक्रम पार पडले.

रविवारी पहाटे नाथांची पहिली व सोमवारी पहाटे दुसरी भाकणूककार भगवान डोणे, महाराज यांचे सुपुत्र सिद्धार्थ डोणे, महाराज यांनी तर घुमट मंदीर येथे तिसरी अखेरची भाकणूक भगवान डोणे, महाराज यांनी कथन केली. गेल्या पाच दिवसांत या यात्रेसाठी हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती. यात खडक मंदिरात सोमवारी उजाडता नाथांची 4.30 ते 6.30 या वेळेत तर यानंतर घुमट मंदीर येथे सकाळी 9 वाजता भाकणूक झाली.

Halsiddhanath

रविवारी दिवसभर महानैवद्याचा कार्यक्रम व सोमवारी सकाळी घुमटातील भाकणूक झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजता सुमारास कर तोडून यात्रेची सांगता करण्यात आली. तत्पूर्वी वालंग कार्यक्रम झाला. सायंकाळी 5.30 वाजता उत्सवस्थळी ढोल वादन व अखंड भंडाऱ्याची उधळण झाली. त्यानंतर नाथांच्या दोन्ही पालख्यांची व सबिना सोहळ्याची हालसिद्धनाथ व श्री. महालक्ष्मी मंदिर  प्रदक्षिणा झाली.

त्यानंतर 6 वाजता वाड्यातील मंदिरात नाथांची मूर्ती स्थानापन्न झाली. त्यानंतर कुर्ली येथील देवाची पालखी सोहळा मार्गस्थ झाला. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असणारी यात्रा कोरोनाचे सर्व नियम पाळत पार पाडण्यात आली. यासाठी यात्रा कमिटी, पोलीस व ग्रामपंचायत प्रशासन देवस्थान ट्रस्टसह  सर्वांनी सहकार्य केले.

सलग दुसऱ्यावर्षी…

काळाच्या कसोटीवर उतरणाऱ्या श्री हलसिद्धनाथांच्या (Halsiddhanath) भाकणूकीला या यात्रेत मोठा मान आहे. दरवर्षी नाथ आपल्या भाकणुकीतून भक्तांना सावध करीत पुढील भविष्य कथन करतात. यंदा सलग दुसऱ्यावर्षी रविवारी व सोमवारी पहाटे पहिली व दुसरी भाकणूक भगवान डोणे, महाराज यांचे सुपुत्र सिद्धार्थ डोणे (वय-18 ) यांनी सलग दुसऱ्या वर्षी भाकणूक कथन केल्याने याची उत्सुकता भाविकांत लागून होती.

पहा व्हिडीओ : राजू शेट्टी-पवारांच्या त्या भिजलेल्या सभेनंतर शेतकरी ढेकूळ विरघळल्याप्रमाणे विरघळला

Back to top button