'चंद्रकांत पाटलांनी राज्‍यातील रस्‍त्‍यांचा बट्ट्याबोळ केला' | पुढारी

'चंद्रकांत पाटलांनी राज्‍यातील रस्‍त्‍यांचा बट्ट्याबोळ केला'

मुदाळतिट्टा ; पुढारी वृतसेवा

भारतीय जनता पक्षाच्या काळात आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे चंद्रकांत पाटील हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांनी रस्ते तयार करण्यासाठी हायब्रीड अन्युटी असा एक नवीन रस्ता प्रकल्प आणला होता. त्यामधून देवगड-निपाणी रस्ता त्यांनी मंजूर केला. राज्यातील असे अनेक रस्ते बंद पडलेले आहेत. अतिशय चुकीची बेकायदेशीर योजना चंद्रकांत पाटील यांनी आणली आणि राज्यातील रस्त्यांचा बट्ट्याबोळ केला. अशी टिका ग्रामविकास मंत्री नाम हसन मुश्रीफ यांनी केली.

ते निढोरी ता. कागल येथे विविध विकास कामांचे उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी खासदार संजय मंडलिक प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिद्री साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक गणपतराव फराकटे होते.

यावेळी मुश्रीफ म्हणाले की, निपाणी-देवगड रस्त्याचे काम जितेंद्र सिंग या कंपनीकडे देण्यात आले आहे. ते कोर्टात गेले तर हे काम लांबेल म्हणून अधिकारी सुद्धा त्यांना नरमाईने बोलतात.

परंतु ह्या आठ दिवसात मी आणि खासदार संजय मंडलिक त्यांना बोलावून जर हा रस्ता करणार नसतील तर त्याला हे काम सोडायला लावण्यासाठी डोक्यावर उभे केल्याशिवाय सोडणार नाही.

हा रस्ता लवकरच पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. या राज्यातील अनेक रस्ते बंद पडलेले आहेत. ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन त्‍यांनी दिले.य

मंडलिक, मुश्रीफ ही दोन्ही वेगवेगळ्या विचारांची मंडळी विकासासाठी एकत्र

खासदार संजय मंडलिक यावेळी म्हणाले, मंडलिक, मुश्रीफ ही दोन्ही वेगवेगळ्या विचारांची मंडळी तालुक्याच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत.

कागल तालुक्यातील विकास कामाचे पर्व सुरु आहे. स्व. खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या राजकारणाची सुरवात निढोरी येथुन झाली आहे.

त्यामुळे या गावाचा विकास करणे हे आमचे कर्तव्य आहे. देवगड निपाणी हा रस्ता प्रश्न त्वरित सोडवण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील.

देवानंद पाटील यांनी केलेले काम भूषणावह असुन निश्चितच त्यांना एखादे मानाचे पद देण्यात येईल असे आश्वासन त्‍यांनी दिले.

स्वागत उपसरपंच सविता चौगले यांनी तर प्रास्ताविक सरपंच अमित पाटील यांनी केले. यावेळी अतुल जोशी, देवानंद पाटील, विकास सावंत यांची भाषणे झाली.

यावेळी माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील, कागलच्या नगराध्यक्ष माणिक माळी, भैय्या माने, युवराज बापु पाटील, केशवराव पाटील, विकास पाटील कुरुकलीकर,

बी. एम. पाटील, डी. एम. चौगले, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, जयश्री पाटील, आश्विनी पाटील, शशिकांत पाटील यांच्यासह मान्यवर हजर होते.

Back to top button