शिंगणापूर बंधारा दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू; आज पाणीपुरवठा बंद | पुढारी

शिंगणापूर बंधारा दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू; आज पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शिंगणापूर बंधारा मधील गळती काढण्याचे काम रविवारपासून सुरू झाले. मात्र, पाणी उपसा दुपारपर्यंत सुरू असल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर फारसा परिणाम झाला नाही. मात्र, सोमवारी (दि.25) पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. विशेष खबरदारी म्हणून महापालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठा करून नागरिकांना दिलासा दिला.

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी शिंगणापूर बंधारा मधील पाणी उपसा केला जातो. 20 गाळ्यांच्या या बंधार्‍यात 12 लोखंडी प्लेटद्वारे पाणी अडविण्यात आले आहे. मात्र, लोखंडी प्लेट खराब झाल्याने बंधार्‍याला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. गळतीमुळे पाणी वाया जाते. यापूर्वी एप्रिल महिन्यात महापालिकेने बंधार्‍याची गळती काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. त्यावेळी नदीत पाणी मुबलक असल्याने केवळ आठ प्लेट बदलण्यात यश आले.

रविवारपासून पुन्हा बंधारा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. रविवारी सकाळीच महापालिका यंत्रणेने पंचगंगा नदीचे पाणी अडवून बंधारा दुरुस्तीचे काम सुरू केले. या बंधार्‍यातील लोखंडीत प्लेट खराब झाल्याने त्या बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. धरणातून पाणी बंद केल्याने नदीची पाणीपातळी कमी झाली. तरीही प्लेटा काढता आल्या नाहीत. त्यामुळे दुपारपर्यंत पाणी उपसा सुरू ठेवून पाणीपुरवठा सुरळीत केला. दुपारनंतर पाणीपातळी कमी झाली. प्लेटा काढण्याबरोबरच बंधार्‍यातील गाळ काढण्याचेही काम सुरू केले.
सोमवारी सकाळी बंधार्‍यातील लोखंडी जुन्या प्लेटा काढण्यास सुरुवात केली जाणार आहे. दुपारपर्यंत सर्व प्लेटा काढून दुसर्‍या नवीन प्लेटा बसविण्यात येणार आहेत. दुपारनंतर धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन आहे. दुपारी पाणी सोडल्यास सायंकाळनंतर अथवा रात्री उशिरा शिंगणापूर बंधार्‍यापर्यंत पोहोचेल, असा पाटबंधारे विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे बंधार्‍याजवळ पाणी येताच तत्काळ पाणी उपसा केला जाणार आहे. टाक्या भरल्यानंतर मंगळवारी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र, मंगळवारी सकाळच्या सत्रात शहरवासीयांना पाणी मिळण्याची शक्यता कमी असून, दुपारनंतर पाणीपुरवठा होईल, असे पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले.

Back to top button