कोल्हापूर : आरोग्य विभाग भरती परीक्षेत गोंधळ; प्रश्नपत्रिकेची अदलाबदल | पुढारी

कोल्हापूर : आरोग्य विभाग भरती परीक्षेत गोंधळ; प्रश्नपत्रिकेची अदलाबदल

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग मधील गट ‘क’ प्रवर्गातील पदांसाठी रविवारी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत कोल्हापुरातील एका केंद्रावर मोठा गोंधळ उडाला. प्रश्नपत्रिकेच्या अदलाबदलीवरून संतप्त झालेल्या उमेदवारांनी परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ घातला, तसेच अधिकारी, सुपरवायझर यांच्या अंगावर धावून गेले. तब्बल दोन तास हा गोंधळ सुरू होता.

यानंतर नॅशनल अ‍ॅकॅडमी मुडशिंगी रोड केंद्रावरील ब्लॉक 4 मधील सुमारे 50 उमेदवारांनी परीक्षेवर बहिष्कार घातला. त्यामुळे वातावरण अधिक गंभीर बनले होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

आरोग्य विभाग मधील गट ‘क’ प्रवर्गातील पदांसाठी राज्यातील आठ परिमंडळांत सकाळी 10 ते 12 आणि दुपारी 3 ते 5 या वेळेत लेखी परीक्षा झाली. गट ‘क’ मधील 4,500 पदांसाठी एकूण 4 लाख 5 हजार उमेदवार परीक्षेस पात्र होते. यामध्ये जिल्ह्यातील 72 केंद्रांवर 28,166 उमेदवार परीक्षा देणार होते. ही परीक्षा न्यासा कंपनीतर्फे घेतली. गट ‘क’ साठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहायक व नर्सिंगसाठी ही परीक्षा होती. कोल्हापुरातील केंद्रावरील सकाळच्या सत्रातील परीक्षा सुरळीत पार पडली मात्र, दुपारच्या सत्रात गोंधळ झाला. नॅशनल अ‍ॅकॅडमी मुंडशिगी येथील केंद्रावर एकूण ब्लॅाक 10 मध्ये परीक्षेची व्यवस्था केली होती. येथे 241 उमेदवार परीक्षा देणार होते. सहा ब्लॉकमधील परीक्षा सुरळीत झाली; पण ब्लॉक 4 मध्ये प्रयोगशाळा तंत्र, प्रयोगशाळा सहायक, नर्सिंगच्या प्रश्नपत्रिकेत अदलाबदल झाली.

हा प्रकार उमेदवारांच्या लक्षात येताच त्यांनी सुपरवायझर यांच्या निदर्शनास आणून दिला. सुपरवायझरनी चारही ब्लॉकमधील प्रश्नपत्रिका एकत्र करून ज्या-ज्या पदासाठी उमेदवार बसले आहेत, त्यांना त्या देण्यास सुरुवात केली. पण उमेदवारांनी पेपर फुटला आहे. आम्ही परीक्षेस बसणार नाही. परीक्षा पुन्हा घ्या, असे सांगत परीक्षा केंद्रावर गोंधळ सुरू केला. या घटनेची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, डॉ. विलास देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांना मिळताच त्यांनी परीक्षा केंद्रावर धाव घेतली. परीक्षेचा वेळ वाढवून देतो. परीक्षा देण्याबाबत उमेदवारांची मनधरणी केली. मात्र संतप्त उमेदवारांनी नकार दिला. अखेर परीक्षा न देताच ब्लॉक 4 मधील उमेदवारांनी परीक्षा केंद्र सोडले.

कोल्हापुरातील एकूण 72 केंद्रांवर आरोग्य विभागाची परीक्षा झाली. प्रश्नपत्रिकेच्या अदलाबदलीमुळे मुडशिंगी केंद्रावर गोंधळ निर्माण झाला. उमेदवारांना अतिरिक्त वेळ देण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. परीक्षा पुन्हा घेण्याची त्यांनी मागणी केली.
– डॉ. अनिल माळी
जिल्हा शल्यचिकित्सक

  • अधिकार्‍यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार
  • संतप्त उमेदवारांचा परीक्षेवर बहिष्कार

Back to top button