Kolhapur : शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे, लाऊडस्पीकरही बंद | पुढारी

Kolhapur : शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे, लाऊडस्पीकरही बंद

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शहरात कोल्हापूर महापालिकेने राबविलेला सेफ सिटी प्रोजेक्ट आता बंद आहे. दीड वर्षापूर्वी हा प्रकल्प महापालिकेने पोलिसांकडे सोपविला होता. आपत्तीच्या काळात उपयोगी पडेल. यासाठी सेफ सिटीच्या नावाने राबविलेला हा प्रकल्पच बंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अशांतता घडविणार्‍यांचे फावते.

राज्यशासन आणि महापालिकेने या प्रकल्पांची आवश्यकता लक्षात घेऊन बंद पडलेला हा प्रकल्प तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे. आपत्तीच्या काळात लोकांना लाऊडस्पीकरवरून आवाहन करणारी पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टीम देखील बंदच आहे. स्वसंरक्षणाची तुटपुंजी साधने शिट्टी आणि काठीच्या मदतीनेच पोलिसांना दंगलीवर नियंत्रण मिळवावे लागले. त्यामुळे दंगल आटोक्यात यायला वेळ लागला.

कोल्हापूर महापालिकेने सात वर्षांपूर्वी सेफ सिटी हा प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पातून शहरातील प्रमुख 65 ठिकाणी 165 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, वाहतूक व्यवस्थेसह शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त होता. महापालिकेने त्यासाठी सहा कोटी रुपये खर्च केले होते. चार ते पाच वर्ष हा प्रकल्प सुरू होता. त्यानंतर प्रकल्प पुढे सुरू ठेवण्याची जबाबदारी महापालिकेकडून पोलिसांच्या ताब्यात गेली. काही काळानंतर यापैकी बहुतांश कॅमेरे बंद पडलेले आहेत, तर आपत्तीच्या काळात लोकांना सूचना देण्यासाठी बसविलेली सिस्टीम मॅनेजर( चौका-चौकातील स्पीकर) बंद आहेत. त्यामुळे पोलिसांना सूचना देण्यासाठीची साधने अपुरी पडली. अखेर पोलिसांना हेल्मेट, शिट्टी आणि काठीच उपयोगी पडली. कोट्यवधी रुपये खर्च करून बसविलेली ही यंत्रणा कुचकामी ठरली. या यंत्रणेचा उपयोग तरी काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टीमही कुचकामी

चौकाचौकांत बसविलेल्या लाऊड स्पीकरला पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टीम असे म्हणतात. या व्यवस्थेवरही मोठा खर्च प्रशासनाने केला. परंतु, ही व्यवस्थादेखील कुचकामी ठरली आहे. महापूर किंवा संकटाच्या वेळी लोकांना वेगवेगळी आवाहने करण्यासाठी ही यंत्रणा बसविण्यात आली होती; मात्र या व्यवस्थेचाही आज काही उपयोग झाला नाही.

हेही वाचा : 

Back to top button