माद्याळ; पुढारी वृत्तसेवा : घरची परिस्थिती गरीबीची, आई रोजंदारी करते. वडील बोअरवेल ट्रक ड्रायव्हर. अशा बिकट आर्थिक परिस्थितीत अभ्यासात एकाग्रता, सातत्य, ध्येयाप्रती चिकाटी असलेल्या तमनाकवाडा (ता.कागल) येथील आदिती अशोक घस्ते या मुलीने दहावी परिक्षेत ९३.०० टक्के गुण मिळवून आई वडीलांच्या श्रमाचे चीज केले आहे.
आदितीने स्वयंअध्ययनाच्या जोरावर हे यश मिळवलेले आहे. तिने नियमित शालेय पाठ्यपुस्तके अभ्यासली. संदर्भ पुस्तकांचा वापर कमी केला. घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यासात सातत्य राखले. आदिती इयत्ता पहिलीपासून हुशार व अभ्यासू होती. प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर तमनाकवाडा मराठी शाळेत पुर्ण केले. नजिकच्या सेनापती कापशी (ता.कागल) येथील एका माध्यमिक शाळेत विद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतला. 5 कि.मी. पायपीट करीत ती नेहमी वर्गात उपस्थित राहण्याची धडपड करीत असे. पाठ्यपुस्तके व शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर दहावी परीक्षेत अधिकाधिक गुण मिळवण्याची मनीषा बाळगली.
निश्चित ध्येय गाठण्यासाठी ती दररोज 4 तास अभ्यास करायची. यामध्ये वाचन, मनन यावर अधिक भर दिला. मोबाईलचा वापर शंभर टक्के टाळला.बोर्ड प्रश्नपत्रिका संच सोडविण्यावर भरपूर कष्ट घेतले. तिच्या यशात आजी हौसाबाई गायकवाड यांचा मोलाचा वाटा आहे.आई आश्विनी,वडील अशोक यांचे सहकार्य व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
हेही वाचा