कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठ प्राध्यापक भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराच्या तक्रारीवरून कोल्हापूरचे विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. राजेसाहेब मारडकर यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून विभागीय सहसंचालकपदाचा कार्यभार काढून घेत त्यांना नागपूर येथे मूळ पदावर पाठविण्यात आले आहे.
गगनबावडा तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेतील प्राध्यापक भरतीची प्रक्रिया हॉटेलमध्ये राबविण्यात आली. त्याबाबतचे वृत्त दै. 'पुढारी'ने 13 एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेे होते. त्याची दखल घेत राज्य शासनाने द्विसदस्यीय चौकशी समिती नेमली. समितीने त्यांच्या अहवालात डॉ. मारडकर यांचे सहसंचालक म्हणून सहायक प्राध्यापकांच्या निवड प्रक्रियेवर योग्य पर्यवेक्षक नियंत्रण नसल्याचा ठपका ठेवला आहे. त्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ विभागात परत पाठविण्यात आले. कोल्हापूर विभागीय सहसंचालकपदाचा अतिरक्त कार्यभार राजाराम महाविद्यालयाचे सहायक प्रा. डॉ. हेमंत कठरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.