नगरप्रदक्षिणा, अष्टमीचा जागर उत्साहात; अंबाबाईची वाहनातून मिरवणूक | पुढारी

नगरप्रदक्षिणा, अष्टमीचा जागर उत्साहात; अंबाबाईची वाहनातून मिरवणूक

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पारंपरिक लवाजमा, सप्तरंगी रांगोळ्या व फुलांच्या पायघड्या, नेत्रदीपक आतषबाजी आणि अंबा माता की जय, असा अखंड जयघोष अशा उत्साही वातावरणात बुधवारी करवीर निवासिनी अंबाबाईची वाहनातून नगरप्रदक्षिणा झाली. तसेच नवरात्रौत्सवांतर्गत अष्टमीला जुना राजवाडा येथे तुळजाभवानीचा जागर सोहळाही उत्साहात पार पडला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अष्टमीची नगरप्रदक्षिणा व जागराच्या सोहळ्याला गर्दी टाळण्यासाठी संपूर्ण मार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नगरप्रदक्षिणा मार्गाला जोडणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले होते. तरीही नगरप्रदक्षिणेच्या मार्गावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. साडेनऊ वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार व देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवडे यांच्यासह पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत नगरप्रदक्षिणेस प्रारंभ झाला. पोलिस, स्वयंसेवक, देवस्थानचे कर्मचारी यांनी देवीच्या वाहनाभोवती दोरखंडाने गराडा घातला होता. तरीही अनेक अतिउत्साही पुढे-पुढे सरसावत होते. अनेकजण नगरप्रदक्षिणेचा सोहळा आपल्या मोबाईलमध्ये टिपत होते, तर अनेक जण केवळ मनोभावे देवीला नमस्कार करत होते.

जुना राजवाड्यात आरती-जागर…

महाद्वा रोड, गुजरी, भाऊसिंगजी रोडमार्गे अंबाबाईचे वाहन रात्री सव्वा दहा वाजता जुना राजवाडा येथील तुळजाभवानी मंदिरात आले. तेथे अंबाबाई व तुळजाभवानीच्या भेटीचा सोहळा झाला. यानंतर साडेदहा वाजता आरती व अष्टमीचा जागर झाला. सौ. याज्ञसेनी महाराणी, सौ. संयोगीताराजे, मधुरिमाराजे, यशस्विनीराजे यांच्या हस्ते देवीची आरती झाली. यावेळी खासदार संभाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजे, यशराजराजे आदींसह करवीर संस्थानचा पारंपरिक लवाजमा आणि सरदार, मानकरी उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत नगरप्रदक्षिणा सुरू होती. मंदिरात नियमित पालखी प्रदक्षिणा आणि आरतीने सांगता झाली. यानंतर पहाटेपर्यंत नवचंडी याग सुरू होता.

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

नगरप्रदक्षिणेवेळी भाविकांनी केलेल्या प्रचंड गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडाला होता. बहुतांशी लोकांच्या तोंडावर मास्क नव्हता. लोक बिनधास्त विनामास्क फिरताना दिसत होते. पोलिस किंवा महापालिका कर्मचार्‍यांपैकी कोणीही अशांना हटकत नव्हते.

Back to top button