कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातांत तिघे ठार; पाच जखमी | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातांत तिघे ठार; पाच जखमी

कोल्हापूर : टीम पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत तिघेजण ठार, तर पाचजण जखमी झाले. ओंकार दिनकर मुगडे (वय 18, रा. काळजवडे, ता. पन्हाळा), वैष्णव उत्तम पोटे (17, रा. उत्तूर, ता. आजरा) व पांडुरंग गणपती ढेकळे (57, रा. आर.के.नगर, कोल्हापूर) अशी
मृतांची नावे आहेत.

भरधाव दुचाकीची कचरा डंपरला धडक; एकाचा मृत्यू

कचरा भरून निघालेल्या डंपरला भरधाव दुचाकीने बाजूने दिलेल्या धडकेत ओंकार मुगडे (रा. काळजवडे) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेले शिवाजी विकास नेमणे (18, रा. कांटे, शाहूवाडी) व करण पाटील (रा. काळजवडे, ता. पन्हाळा) गंभीर जखमी झाले. मंगळवारी मध्यरात्री शाहूपुरी पाचव्या गल्लीत हा अपघात घडला. याबाबत डंपरचालक सतीश रामराव देवेकर (रा. मंगळवार पेठ) यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली.

फिर्यादी सतीश देवेकर हे महापालिकेच्या कचरा डंपरवर चालक म्हणून काम करतात. मंगळवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ते कचर्‍याचा डंपर घेऊन गोकुळ हॉटेलकडून गवत मंडईकडे निघाले होते. पटेल स्पेअरपार्टजवळ डंपर आला असता नाईक अँड नाईक कंपनीकडून पाचव्या गल्लीतून भरधाव आलेल्या दुचाकीने डंपरच्या इंधन टाकीजवळ जोराची धडक दिली. देवेकर यांनी डंपरमधून उतरून पाहिले असता तिघे तरुण जखमी अवस्थेत दिसले. त्यांनी जखमींना अग्निशमन वाहनाच्या मदतीने तत्काळ उपचारासाठी सीपीआरमध्ये आणले. ओंकार मुगडेच्या डोक्याला, छातीला गंभीर दुखापत झाल्याने अंतर्गत रक्तस्राव होऊन त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कामे आटोपून घरी जाताना अपघात

मृत ओंकार मुगडे, जखमी शिवाजी व करण हे तिघेही पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यांतील आहेत. त्यांच्या गावातील एकाचे शहरात हॉटेल असून, तिघेही तिथे काम करत होते. नवरात्रीनिमित्त देवदर्शन व दांडिया पाहण्याचे ठरवून तिघे हॉटेलवरून निघाले. शहरात फेरफटका मारून तिघेही गावी जाणार होते.

डिझेल टाकी फुटली

दुचाकीने डंपरला उजव्या बाजून धडक दिली. ही धडक दोन्ही चाकांदरम्यान असणार्‍या डिझेल टाकीला बसली. धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये डंपरची टाकी फुटून डिझेल सर्वत्र पसरले होते.

उत्तूरमधील अपघातात शाळकरी मुलगा ठार

उत्तूर ः येथील अपघातात शाळकरी मुलगा वैष्णव उत्तम पोटे (17) जागीच ठार झाला. तर दोघे जखमी झाले. बुधवारी पहाटे धुके असल्याने हा अपघात घडला.

वैष्णव व त्याचा मित्र प्रेम दीपक बोरवडकर (रा. माद्याळ पैकी हुडा, ता. कागल) हे दोघे पहाटे सव्वापाचच्या सुमारास चव्हाणवाडी येथील जोमकाई देवीच्या आरतीला मोटारसायकलवरून निघाले होते. उत्तूरलगत असलेल्या तुरूक ओढ्यावरील पुलावर ओंकार उत्तूरकर अन्य मित्रांची वाट पाहत होता. धुक्यात समोरचे न दिसल्याने मोटारसायकलने उत्तूरकरला जोराची धडक दिल्याने तिघेही ओढ्यात पडले. यातच दुचाकीवर मागे बसलेला वैष्णव हा ओढ्यामधील दगडावर जाऊन आदळल्याने जागीच ठार झाला. प्रेम व ओंकार हे दोघेही जखमी झाले. याप्रकरणी दुचाकीचालक प्रेम बोरवडकर याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. वर्दी दत्तात्रय कापसे यांनी दिली आहे.

आदमापूर येथे अपघातात कोल्हापूरचा दुचाकीस्वार ठार

मुदाळतिट्टा : निपाणी-राधानगरी राज्यमार्गावर आदमापूरनजीक मोटारसायकल आणि केमिकल घेऊन जाणारा टँकर यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार पांडुरंग गणपती ढेकळे (57, रा. आर.के.नगर, कोल्हापूर) हे ठार झाले. अपघाताची नोंद भुदरगड पोलिस ठाण्यात झाली आहे.

ढेकळे हे आदमापूर येथे बाळूमामांच्या दर्शनासाठी मोटारसायकलवरून चालले होते. निपाणीकडे चाललेल्या टँकरने (एच.आर. 38 डब्ल्यू 9256) धडक दिल्याने ते टँकरच्या पुढील चाकाखाली सापडले. गंभीर जखमी झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सुरेंद्र सिंग रामजी ठाकूर (24) या उत्तर प्रदेशच्या टँकरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टेम्पोच्या धडकेत शाळकरी मुलगी जखमी

इचलकरंजी : टेम्पोने दिलेल्या धडकेमध्ये शाळकरी विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. ही घटना चंदूर येथे घडली. तिला तातडीने एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही विद्यार्थिनी सकाळी 9 च्या सुमारास शाळेला जाण्यासाठी घरातून निघाली. सायकलवरून जात असताना चंदूर गावातील बिरोबा मंदिराजवळ एका भरधाव टेम्पोने तिला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली आहे.

Back to top button